वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात आला असून, अवघ्या दीड महिन्यात १ जून ते १५ जुलैपर्यंतच्या काळात कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या आता चार अंकीवरून दोन अंकावर आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित केवळ ८९ अॅक्टिव्ह रुग्ण असून, रुग्णालयात केवळ पाच व्यक्ती दाखल आहेत, तर गेलेल्या १५ दिवसांत ३१२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला असला, तरी पहिल्या लाटेत एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत केवळ ६,६६३ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला, तर जानेवारी १ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान २२७१ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आणि एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान १८७ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यूही झाला. दुसऱ्या लाटेत मार्च ते मे २०२१ दरम्यान ३१ हजार १२२ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. याच कालावधित २७० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर जिल्हाभरात २२७९ व्यक्ती बाधित व्यक्ती उपचाराखाली होते. जूनच्या सुरुवातीपासून मात्र दुसरी लाट ओसरू लागली आणि अवघ्या दीड महिन्यातच उपचाराखालील रुग्णांची संख्या चार अंकीवरून दोनअंकी झाली आहे. जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत ४१ हजार ५८५ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ४० हजार ८७३ व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तर एकूण ६२२ जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत उपचाराखाली केवळ ८९ रुग्ण असून, रुग्णालयात दाखल केवळ ५ जण आहेत.
-----------
जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर
कोरोना संसर्गाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात आली असून, अवघ्या दीड महिन्यात साडेपाच हजारांहून अधिक व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तर नव्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यात मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव आणि कारंजा या चार तालुक्यांत आठवड्याला केवळ ४ ते ५ रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय वाशिम आणि रिसोड तालुक्यातही अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ३० पेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आला आहे.
------------
तिसऱ्या लाटेबाबत दक्षता
जिल्ह्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर कोरोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला असला तरी, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे आरोग्य विभाग पूर्णपणे दक्षता बाळगत असून, या लाटेचा सामना करण्यासाठी लसीकरणाला वेग देण्यासह चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दिवसाला ३०० चाचण्या केल्या जात आहेत. १८ वर्षे वयावरील प्रत्येक व्यक्तीने लस घेण्यासह कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच चाचणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग करीत आहे.
---------------
कोट : दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात आता कोरोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आहे. सद्यस्थितीत ८९ रुग्ण उपचाराखाली असून, रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाणही नगण्य आहे. तथापी, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने नागरिकांनी पूर्वीसारखीच खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने लस घेण्यासह लक्षणे दिसताच चाचणी करून घ्यावी.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
----------
कोरोनाबाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह - ४१५८५
अॅक्टिव्ह - ८९
बरे झालेले -४०८७३
मृत्यू - ६२२
------------
अशी घटली रुग्णसंख्या
३१ मार्च
एकूण बाधित -१६०७५
अॅक्टिव्ह - २६१९
---------
३० एप्रिल
एकूण बाधित - २७४६०
अॅक्टिव्ह- ४००९
------------
३१ मे
एकूण बाधित - ३७३२६
अॅक्टिव्ह- २१५८
------------
३० जून
एकूण बाधित - ४०६०७
अॅक्टिव्ह- १८७
-------------
१५ जुलै
एकूण बाधित - ४०८७३
अॅक्टिव्ह- ८९
----