आजारी जावयाला सासूबाई देणार किडनीचे दान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 02:31 PM2019-11-27T14:31:39+5:302019-11-27T14:31:59+5:30
लवकरच पुणे येथील दवाखान्यात संदिप काळे यांच्यावर ‘किडनी ट्रान्सप्लान्ट’ची शस्त्रक्रिया होणार आहे.
- शंकर वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : शिरपूर येथे वास्तव्यास असलेले संदिप काळे (वय ३६ वर्षे) हे गत वर्षभरापासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यातून बरे व्हायचे असल्यास किडनी बदलावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले; मात्र महत्प्रयासानेही किडनी उपलब्ध होणे दुरापास्त झाले. अशावेळी संदिपच्या सासूबाई बेबीबाई भालेराव यांनी मुलींच्या सुखी संसारासाठी जावयाला किडनी दान देण्याचा निर्धार केला. यासंबंधीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून लवकरच पुणे येथील दवाखान्यात संदिप काळे यांच्यावर ‘किडनी ट्रान्सप्लान्ट’ची शस्त्रक्रिया होणार आहे. दरम्यान, जावयासाठी सासूबार्इंनी किडनी दान देण्याची दर्शविलेली तयारी हा चर्चेचा तद्वतच प्रेरणादायी विषय ठरला.
शिरपूर येथील रहिवासी तथा काही वर्षांपासून पुणे येथे एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या संदिप काळे यांच्या दोन्ही किडन्या वर्षभरापासून खराब झाल्या. यामुळे ते त्रस्त झाले असून किमान एक किडनी बदलली तरी जगणे सुसह्य होऊ शकते, असा सल्ला डॉक्टरांनी दिला; मात्र किडनी देणार कोण, हा मोठा प्रश्न होता. अशावेळी शिरपूर येथेच वास्तव्यास असलेल्या संदिप काळे यांच्या सासूबाई बेबीताई वसंतराव भालेराव यांनी जावयाला स्वत:ची किडनी दान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्याला जाऊन वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली.
संदिप काळे हे तरूण असून त्यांच्या सासूबाई त्यांना किडनी देणार असल्याने संदिपची पत्नी तथा बेबीताई यांची मुलगी दिपिका काळे, आठ वर्षीय मुलगा प्रथमेश व पाच वर्षे वयाची मुलगी स्वरा या कुटूंबावर ओढवलेले संकट दुर होणार आहे. तथापि, बेबीताई भालेराव यांनी आपल्या मुलीच्या सुखी संसारासाठी घेतलेल्या या पुढाकाराचे व दाखविलेल्या धाडसाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
जावयांना किडनीच्या आजाराने पछाडले होते. यामुळे माझ्या मुलीचे कुटूंब उध्वस्त होण्याच्या मार्गाप्रत पोहचले होते. जावई आणि मुलगी तरूण असून अशात त्यांच्यावर ओढवलेले संकट मला पाहवले गेले नाही. त्यामुळेच जावईबापूंना एक किडनी दान करण्याचा निर्धार केला आहे.
- बेबीताई भालेराव
शिरपूर जैन, ता. मालेगाव