वाशिम येथे फळप्रक्रिया व संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या हालचाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 07:24 PM2017-11-10T19:24:32+5:302017-11-10T19:28:03+5:30
वाशिम : वाशिम येथे फळप्रक्रिया व फळसंशोधन केंद्र स्थापन करावे अशी मागणी आमदार अमित झनक यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे (पीकेव्ही) लावून धरल्यानंतर कार्यकारी परिषदेच्या सभेत यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम येथे फळप्रक्रिया व फळसंशोधन केंद्र स्थापन करावे अशी मागणी आमदार अमित झनक यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे (पीकेव्ही) लावून धरल्यानंतर कार्यकारी परिषदेच्या सभेत यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. सदर प्रस्ताव आता कृषी विद्यापिठातर्फे मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला जाणार असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत. प्रस्तावाच्या मान्यतेसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार झनक यांनी शुक्रवारी सांगितले.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेची सभा ३ नोव्हेंबर रोजी अकोला येथे पार पडली. या सभेत आमदार तथा कार्यकारी परिषदेचे सदस्य अमित झनक यांनी वाशिम येथे फळप्रक्रिया व फळसंशोधन केंद्र निर्माण करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. वाशिम जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यापैकी असून विकासाच्या दृष्टीने मागासलेला आहे. जिल्ह्यात फळबागेखालील क्षेत्रफळ अत्यल्प असून, सोयाबीन तूर, गहू, हरबरा, कापूस, ज्वारी अशी प्रमुख पिके घेतली जातात. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. परिणामी शेतकºयांनी फळबागोकडे वळणे आवश्यक ठरू पाहत आहे. हलक्या व मध्यम जमिनीवर सिताफळ, लिंबू, डाळींब, पेरू, संत्रा, इत्यादी फळपिकांचे उत्पन्न चांगल्या प्रमाणात होऊ शकते. योग्य दरात फळबागेसाठी रोपे उपलब्ध करुन दिल्यास व त्यांना वेळोवेळी आधुनिक व सुधारीत तंत्रज्ञानाची माहिती दिली तर फळबागेखालील क्षेत्रफळात वाढ होऊ शकतो, हा मुद्दा अमित झनक यांनी निदर्शनात आणून दिला.
वाशिम येथे कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र असून तेथे विद्यापिठाची ४३.४० हेक्टर जमीन आहे. या जमिनीपैकी २० हेक्टर जमिनीवर फळ संशोधन व फळप्रक्रिया केंद्र उभारल्या जाऊ शकते. वाशिम येथे फळसंशोधन केंद्र उभारल्या गेल्यास फळबाग निर्मिती व फळप्रक्रियेवर संशोधन केल्या जाउ शकते. फळबागेसंदर्भात अनेक उद्दिष्ट साध्य होऊ शकतील, ही बाबत आमदार झनक यांनी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेच्या सभेत निदर्शनास आणून दिली. वाशिम येथे फळप्रक्रिया व फळ संशोधन केंद्र स्थापन करण्यासंबंधीचा ठराव मांडला असता, सदर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यासंदर्भातचा प्रस्ताव शिफारसीसह शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात यावा, अशी मागणी झनक यांनी कुलगुरूकडे केली. याबाबत विद्यापीठ सकारात्मक असल्याची ग्वाही कुलगुरूंनी दिल्याने आणि शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही अमित झनक यांनी दिल्याने फळप्रक्रिया व संशोधन केंद्र स्थापन होण्याच्या जिल्हावासियांच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत.