तालुक्यामध्ये दररोज शंभराहून अधिक कोविड रुग्ण निघत आहेत. मालेगाव येथे व्यवस्था नसल्याने त्यांना वाशिम येथे उपचारासाठी जावे लागत आहे; परंतु तेथेही खाजगी दवाखान्यामध्ये बेड शिल्लक नाहीत, तर सरकारी दवाखान्यातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून, त्यांचे नातेवाईकही रुग्णांच्या काळजीने भयग्रस्त झाले आहेत, त्यामुळे मालेगाव शहरामध्ये किमान २०० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात यावे. अशी मागणी जोर धरत होती, तसे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. अखेर यास प्रशासनाकडून चालना मिळाली असून, तालुक्यात कोविड सेंटर उभारणीच्या हालचाली वाढल्या आहेत. मात्र, अजून कोणत्याच जागेवर शिक्कामोर्तब झाले नाही.
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले असून, ते कधी संपेल हे कोणीही सांगू शकत नाही. पहिल्या लाटेपेक्षाही दुसरी लाट प्रचंड वेगाने वाढत असून, हा वेग असाच वाढत राहिल्यास फार मोठे संकट आरोग्य विभागावरच नव्हे, तर सगळ्यांवरच येणार आहे. मात्र, त्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. तालुक्यात दररोज रुग्ण वाढत आहेत. काही गावांमध्ये तर कोरोनाने थैमान घातले आहे. पहिल्या लाटेत वयस्कर व ज्यांना मधुमेह, रक्तदाब, दमा अशा प्रकारचे आजार आहेत त्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त होते. यावेळेस मात्र हा संसर्ग सर्वच वयातील लोकांना होत असून, त्यामध्ये अनेकांचे जीव गेले आहेत.
मालेगाव तालुक्यात कोविड सेंटर उभारले, तर वाशिमवरील ताणसुद्धा कमी होणार आहे आणि मालेगाव तालुक्यातील रुग्णांना येथे सुविधा मिळणार आहेत. मात्र, कोविड सेंटर पाहण्यासाठी मुख्य अडचण जागेची, तसेच डॉक्टर्स, नर्स स्टाफ, ऑक्सिजन यांची होती. आरोग्य विभागाच्या वतीने या अडचणी दूर करण्यात येत आहेत. मात्र, अजून जागा अंतिम न झाल्याने हा निर्णय लांबत आहे. मालेगाव शहरात जर कोविड सेंटर आणले तर सर्व तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी होईल आणि सर्वांना सोयीचे होईल. मालेगाव शहरातील शाळा, मंगलकार्यालय आदींनी स्वतःहून पुढाकार घेऊन मदत करण्यासाठी समोर येण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
कोविड सेंटर उभारणीकरिता डॉक्टर, कर्मचारी, ऑक्सिजन आदी बाबींकरिता प्रयत्न सुरू आहेत. सुसज्ज जागा शोधल्या जात असून, शहरात मिळाले तर सर्वांना सोयीचे होणार आहे.
रवी काळे
तहसीलदार मालेगाव
..
मालेगाव शहरात जर कोविड सेंटर उभारले, तर रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना मध्यवर्ती ठिकाण म्हणून सोयीचे जाणार आहे. याकरिता शहरातील खाजगी शाळा आणि मंगल कार्यालय यांच्या संचालकांनी स्वतःहून मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.
डॉ. विकास खंडारे
मुख्याधिकारी नगरपंचायत मालेगाव.