वाशिम जिल्ह्यात शाळा सुरू करण्याच्या हालचाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:09 PM2020-11-09T12:09:59+5:302020-11-09T12:10:06+5:30
माध्यमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, संस्थाचालकांशी संपर्क सुरू केला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार दिवाळीनंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात जिल्ह्यात हालचाली सुरू झाल्या असून, त्याअनुषंगाने माध्यमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, संस्थाचालकांशी संपर्क सुरू केला.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्व भूमीवर राज्यात मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून शाळा बंद आहेत. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख घसरल्याने शाळेचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय झाला असून, त्यानुसार दिवाळीनंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात आतापासूनच आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यात माध्यमिकच्या जवळपास ३७२ तर जिल्हा परिषदेच्या पाच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. शासकीय आश्रमशाळा व निवासी शाळेचा अपवाद वगळता अन्य कोणतीही खासगी माध्यमिक किंवा जिल्हा परिषदेची शाळा कोविड केअर सेंटर म्हणून घेण्यात आली नाही. शाळा सुरू होण्याच्या अनुषंगाने शाळांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शाळा शासनाच्या सुचनेनुसार दिवाळीनंतर सुरू होणार असल्याने आठ महिन्यानंतर शाळेची घंटा वाजणार आहे. (प्रतिनिधी)
अशी काळजी घेतली जाणार
शाळा परिसर निर्जंतुकिकरण केले जाणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंग म्हणून एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्यात येइल. सॅनिटायझरची व्यवस्था, तापमापक आदी व्यवस्था केली जाणार आहे. पाण्याची बाॅटल घरूनच आणावी लागणार आहे.
शिक्षण विभागाने ५० शाळांचा घेतला आढावा
नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या सुचना प्राप्त झाल्याने हे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने आतापर्यंत ५० शाळांचा आढावा घेण्यात आला. येत्या आठवड्यात सर्वच शाळांचा शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात येइल.