ग्रामसभेत होणार ‘माझी कन्या भाग्यश्री’चा गजर

By admin | Published: May 1, 2017 02:16 AM2017-05-01T02:16:06+5:302017-05-01T02:16:06+5:30

वाशिम : मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेच्या परिपत्रकाचे वाचन १ मे या महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत केले जाणार आहे.

My daughter Bhagyashree's alarm will be done in Gram Sabha | ग्रामसभेत होणार ‘माझी कन्या भाग्यश्री’चा गजर

ग्रामसभेत होणार ‘माझी कन्या भाग्यश्री’चा गजर

Next

वाशिम : मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेच्या परिपत्रकाचे वाचन १ मे या महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत केले जाणार आहे. या दृष्टीने महिला व बालकल्याण विभागातर्फे ग्रामपंचायतींना परिपत्रक रवाना केले आहे.
मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देऊन खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबविण्यात येत असून, या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता १ मे च्या ग्रामसभेत योजनेच्या शासन निर्णयाचे प्रकट वाचन करावे, असे आवाहनवजा पत्र महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पाठविले आहे.
मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बाल विवाह रोखणे आणि मुलांइतकाच मुलींचा जन्मदर वाढविणे, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी सर्व गटातील दारिद्रय रेषेखालील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेवून त्या व्यतिरिक्त त्यांना विशेष लाभ देण्यासाठी सुकन्या योजना ही ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत विलीन करण्यात आलेली आहे. ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना एप्रिल, २०१६ पासून लागू करण्यात आली आहे.
या योजनेद्वारे बी.पी.एल. व ए.पी.एल. कुटुंबात जन्मास येणाऱ्या मुलीच्या नावे रुपये २१ हजार एवढी रक्कम आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून, लाभार्थी मुलीस वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण एक लाख रुपये एवढी रक्कम विहित अटी व शर्तीच्या पूर्ततेनंतर प्रदान करण्यात आलेली आहे. पहिल्या मुलगी अपत्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या मातेला मुलीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी ५ हजार रुपये देण्याची तरतूद या योजनेत आहे. या योजनेच्या परिपत्रकाचे वाचन जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी केले जाणार आहे. सदर शासन निर्णयाच्या प्रती तसेच परिपत्रकाच्या प्रती सर्व ग्रामपंचातींना वाचन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी दिली.

Web Title: My daughter Bhagyashree's alarm will be done in Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.