लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नांदेड जिल्हयातील ५० भाविक देवदर्शनासाठी काशी, वाराणसी येथे गेले असता ‘लॉक डाऊन’ मुळे तेथे अडकले. तेथील जिल्हाधिकारी यांच्याशी या भाविकांनी संपर्क करुन काही सूचनांचे पालन करण्याच्या सुचनेवरुन त्यांची नांदेड येथे परतण्याची व्यवस्था करण्यात आली. परंतु वाशिम मार्गे नांदेड येथे जात असताना कनेरगाव पोलीसांनी त्यांना चेकपोस्टवर रोखून ठेवले. वाशिमचे तहसीलदार विजय साळवे यांनी त्यांची वाशिम येथील वस्तीगृहात व्यवस्था केली आहे. नांदेड येथील ५० भाविक जगदगुरु विश्वाराध्य सिंहासन , जंगमवाडी मठ वाराणसी तसेच काशी यात्रेसाठी गेले होते. दरम्यान कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर २२ मार्चपासून लॉक डाऊनमुळे हे भाविक तेथे अडकलेत. भाविकांनी वाराणसी येथील मठाचे व्यवस्थापकांचे पत्र घेऊन वाराणसी येथील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुन नांदेड येथे जाण्यासाठी पत्र घेतले. यावेळी सर्व भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्यासोबत उत्तरप्रदेश पोलीस दलात असलेले दोन कर्मचारी सुध्दा देण्यात आलेत. वाराणसी जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार ते वाशिम जिल्हयाची सिमापार करुन हिंगोली जिल्हयातील (वाशिम नजिक) कनेरगावजवळ त्यांना १४ एप्रिल रोजी अडविण्यात आले. तसेच पुढे जाण्यास नकार दिल्याने भाविक वाशिम जिल्हयाच्या सिमेवर बसलेले असल्याची माहिती तहसीलदार विजय साळवे यांना १५ एप्रिल रोजी मिळाली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व भाविकांना वाशिम येथील मागासवर्गिय मुलींचे वस्तीगृह येथे ठेवण्यात आले आहे. भाविकांसोबत असलेले उत्तरप्रदेशचे दोन पोलीस कर्मचारी व तहसीलदार साळवे हे जिल्हाधिकारी यांच्याशी या विषयावर चर्चा करुन पुढील निर्णय घेणार आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये पुढील प्रकीया पार पाडल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार विजय साळवे यांनी दिली