केंद्रसरकारने कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर सोमवार १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षे वयापेक्षा अधिक वयाच्या गंभीर आजारग्रस्त व्यक्तींना कोरोना लसीकरणासाठी को-विन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्याकरिता लाभार्थ्यांना को-विन ॲप २.० मोबाईलमध्ये डाउनलोड करावे लागत आहे, परंतु तालुक्यात बीएसएनएल मोबाईल धारकांना नेटवर्कअभावी को-विन ॲप डाऊनलोड करणे, तसेच ज्या नागरिकांनी को-विन ॲप डाऊनलोड करून नोंदणी केली असतानाही मोबाईलमध्ये ओटीपी नंबर येत नसल्याने संबंधित व्यक्ती कोरोना लसीकरणाच्या नोंदणीपासून वंचित राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वाशिम जिल्ह्यात मंगळवार २ मार्च रोजी सकाळच्या सुमारास बीएसएनएलचे नेटवर्क सुरळीत सुरू होते, त्यात थोड्या कालावधीत अनेक नागरिकांनी को-विन ॲप डाऊनलोड केले परंतु ओटीपी येण्याच्या कालावधी दरम्यान नेटवर्क खंडित झाल्याने संबंधित नागरिकांना लसीकरणाच्या नोंदणीपासून वंचित राहावे लागले. गत कित्येक दिवसांपासून बीएसएनएल नेटवर्कचा लपंडावामुळे बीएसएनएल धारक त्रस्त झाले आहेत. त्याचा फटका आता को-विन ॲपवरील कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसंदर्भात बसत आहे.(प्रतिनिधी)
बॉक्स
मंगळवारी सकाळी को-विन ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड केले. परंतु ऐन ओटीपी येण्याच्यावेळी नेटवर्क बंद झाल्याने कोरोना लसीकरणाची नोंदणी होऊ शकली नाही. यासंदर्भात बीएसएनएलच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. आम्ही सर्व बीएसएनएल धारक या प्रकाराला कंटाळलो आहोत. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन बीएसएनएल मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर तोडगा काढावा.
रमेश व्यास, बीएसएनएल ग्राहक, रिसोड.