मानोरा शहर आणि तालुक्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा लोकसंख्येच्या प्रमाणात अतिशय तोकडी असून मानोरा तालुक्यात १०८ क्रमांकाची केवळ एक रुग्णवाहिका कार्यरत आहे. गंभीर आजारी रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी तातडीने न्यायचे असल्यास सदर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गरीब आणि गरजू रुग्णांचे प्राण धोक्यात येते आणि वेळेवर अवाढव्य खर्च करून व जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाद्वारा गंभीर आजारी व अपघातग्रस्त रुग्णांना न्यावे लागते.
मानोरा शहर आणि तालुक्यातील गरीब आणि गरजू रूग्णांची हेळसांड थांबवावी यासाठी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी २०१८ पासून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी वाशिम, तहसीलदार मानोरा यांना वाढीव तीन रुग्णवाहिकेसाठी लेखी निवेदने देऊन पाठपुरावा केला होता.
प्रशासन रुग्णवाहिका उपलब्ध करून देत नसल्यामुळे या सामाजिक कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयासमोर मानोरा येथे २६ डिसेंबर २०१८ रोजी रास्ता रोको आंदोलनही केले होते हे विशेष.
वाशिम जिल्ह्यातील रुग्णांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता सात अतिरिक्त रुग्णवाहिका शासनाकडून प्राप्त झाल्या आहे. पैकी एक रुग्णवाहिका मानोरा तालुक्याला प्राप्त झालेली आहे.
आम्ही केलेल्या सततचा पाठपुरावा आणि रास्ता रोको आंदोलनाचे फलित उशिरा का होईना प्राप्त झाल्याचे समाधान काही प्रमाणात या रुग्णवाहिकेमुळे आम्हाला आहे.
मिर्झा अहमद बेग
माजी आरोग्य सभापती न.पं. मानोरा,