विदर्भातील बसगाड्यांना हिंगोली, परभणीत ‘नो एण्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:42+5:302021-03-16T04:41:42+5:30
विदर्भातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत आहे. याचा परिणाम हिंगोली व परभणी जिल्ह्यांत होऊ नये म्हणून तेथील ...
विदर्भातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत आहे. याचा परिणाम हिंगोली व परभणी जिल्ह्यांत होऊ नये म्हणून तेथील जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकांनी विदर्भातील एसटी बसगाड्यांना प्रवेशबंदी केली आहे.
अकोला आगाराची अकोला-परभणी ही बसफेरी गतकाही दिवसांपासून रिसोडपर्यंत जात आहे. यामुळे सेनगाव, जिंतूर, येलदरी, परभणीकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पुढे बस जात नसल्याने पानकनेरगाव, सेनगाव, येलदरी, जिंतूर, परभणी जाणाऱ्या प्रवाशांना रिसोडपर्यंत प्रवास करावा लागत आहे. तेथून त्यांना हिंगोली, जिंतूर किंवा परभणी आगाराच्या बसने पुढील प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अनावश्यक चढउतर करावे लागत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अकोला-परभणी बसचालक, वाहक यांच्याशी विचारणा केली असता परभणी आगारातून विदर्भातील अकोला विभागाची बस परभणी येथे आणू नये, असे सांगण्यात आले. मात्र, दुसरीकडे रिसोड आगारात परभणी, जिंतूर, हिंगोली, नांदेड आगारांच्या बसेस नियमित येत आहेत. विशेष म्हणजे परभणी विभागाची जिंतूर आगाराची जिंतूर-अकोला ही बसफेरी अकोल्यापर्यंत येजा करीत आहे.
———————
दोन दिवसांपूर्वी माझ्या कुटुंबातील लोकांना परभणी येथे जायचे होते. मात्र, अकोला-परभणी बस रिसोडपर्यंत जाणार आहे, असे वाहकाने म्हटल्याने खासगी वाहन घेऊन परभणी येथे जावे लागले.
- मुक्तारखा पठाण
शिरपूर जैन
————————
१५ मार्चपर्यंत परभणी जिल्हा प्रशासनाने व नगरपालिका प्रशासनाने विदर्भातील बसेसला परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बंदी केली आहे. त्या कारणास्तव विदर्भातील बसेस हिंगोली व परभणी येथे पाठविणे बंद आहे.
- स्मिता सुतावणे,
विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन विभाग, अकोला