गुरांच्या बाजारात ‘ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 05:03 PM2020-11-04T17:03:47+5:302020-11-04T17:04:22+5:30
Washim News जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, शेलुबाजार, अनसिंग येथे गुरांचा बाजार भरतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अनलाॅकच्या टप्प्यात आठवडी बाजार, गुरांच्या बाजाराला परवानगी मिळाली असून, वाशिमसह अन्य ठिकाणी गुरांचे बाजार भरत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरता गुरांच्या बाजारात मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणे अपेक्षीत आहे. परंतू, याकडे प्रशासनासह शेतकरी, व्यापाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, शेलुबाजार, अनसिंग येथे गुरांचा बाजार भरतो. काही ठिकाणी सॅनिटायझरचा वापर होतो तर अनेक ठिकाणी सॅनिटायझरचा वापर होत नाही. बाजारात येणारे सर्वच जण मास्क वापरत नसल्याचे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येते. गुरांच्या बाजारातील उलाढालही सध्या कमी झाल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले. लाॅकडाऊनपूर्वी जास्त उलाढाल होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गुरांच्या बाजारात सॅनिटायझरची व्यवस्था
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजाराच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आल्याचे मालेगाव, वाशिम येथे दिसून आले.
मास्क किंवा रुमाल तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. तथापि याकडे काही शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
अनलाॅकच्या टप्प्यात गुरांच्या बाजाराला परवानगी मिळालेली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जातील. प्रत्येकाने दक्षता घ्यावी.
- षण्मुगराजन एस., जिल्हाधिकारी
यंदा कोरोनामुळे पशुपालक, शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्याचे दिसून येते. कोरोनापूर्वी म्हैस, बैलाच्या किंमती चांगल्या होत्या. सध्या म्हैशीच्या किंमतीत घट आल्याचे दिसून येते. किंमती कमी असल्याने याचा परिणाम उलाढालीवर होत आहे.
- गाैतम भगत, शेतकरी