लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशात लागू करण्यात आलेल्या सीएए हा नागरिकत्व सुधारणा कायदा यामुळे देशात अशांततेचे वातावरण असून या कायदयाच्या विरोधात समाजवादी पक्षाच्यावतीने संपूर्ण देशात संविधान व देश वाचविण्यासाठी असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे,अशी माहिती समाजवादी पक्षाचे आमदार अबु असीम आजमी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.स्थानिक शासकीय विश्राम गृह येथे समाजवादी पक्षाच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अधिक माहिती देताना आमदार अबु आजमी पुढे म्हणाले की, देश सध्या अगदी नाजुक अवस्थेतुन जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) देशात लागू करून भाजपा प्रणित केंद्र शासनाने हिंदु-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण केल्याचे कार्य केले आहे. सर्व धर्म समभाव असलेल्या या देशात हिंदुच्या सोबत मुस्लिमांनी सुद्धा भरीव योगदान दिल्याचे इतिहासात नोंद आहे. मात्र, केंद्र शासनाने इतर जाती धर्मांना या कायदयाचा लाभ देवून मुस्लिमांना त्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठीच संपूर्ण देशात संविधान बचाव देश बचाव यासाठी असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान यांनी नोट बंदीचा घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा होता. या निर्णयामुुळे देशातील मोठमोठया बँका रिकाम्या झाल्या आहेत. अनेक मोठया लोकांनी बँकाचे मोठे कर्ज उचलून देशातून पळून गेले आहे. या बाबीचा सर्व सामान्य लोकांना फटका बसत आहे. यावर चिंता करण्याऐवजी केंद्र शासन हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून देशात जाती वाद करीत आहे. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याबाबत पुस्तक काढण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवराय यांची तुलना कोणासोबतच करता येत नाही. तसेच तशी तुलना करणे म्हणजे शिवरायांना कमी लेखने होय असे सांगितले. छत्रपतींच्या राजवटीत आर्मी चिफ म्हणून मुस्लिम व्यक्तीवर जबाबदारी होती. असेही त्यांनी नमूद केले आहे. भारतीय जनता पार्टी व राष्टÑीय सेवंक संघ हे दोघे मिळून या देशाला कुठे नेवून ठेवणार अशी चिंता व्यक्त केली. याप्रसंगी डॉ.शेख तसलिम, मोहंमद जावेद, बाबाभाई, आदी समवेत मोठया संख्येत समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
संविधान वाचविण्यासाठी देशात असहयोग आंदोलन - अबु आझमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 4:46 PM