आता घरुनच काढा रेल्वे प्रवासाचे जनरल तिकीट, रांगेपासून होणार सुटका; रेल्वेनं सुरू केली खास सुविधा
By दिनेश पठाडे | Published: December 12, 2022 06:29 PM2022-12-12T18:29:50+5:302022-12-12T18:30:25+5:30
प्रवाशांची रांगेतून सुटका व्हावी, यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने ॲप विकसित केले आहे. त्यामाध्यमातून प्रवाशांनी जनरल तिकीट घर बसल्या काढता येणार आहे.
वाशिम : अनारक्षित तिकीट मिळवण्यासाठी रेल्वेप्रवाशांना तासन तास तिकीट खिडकीसमोर रांगेत उभे राहावे लागते. स्टेशनवर पोहचण्यास विलंब झाला तर अनेकांवर तिकीट न काढताच प्रवास करण्याची वेळ येते. त्यामुळे विना तिकीट प्रवासाचा दंड त्यांना भरावा लागतो. यासर्व समस्येतून प्रवाशांची आता सुटका होणार असून घरुनच रेल्वेप्रवासाचे जनरल तिकीट काढता येणार आहे.
मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने आरक्षित तिकीट काढण्याची सुविधा प्रवाशांना मिळत आहे. मात्र, ऐनवेळी प्रवासाचा बेत आखल्यानंतर अनारक्षित डब्यांतून प्रवास करावा लागतो. त्यासाठी प्रवासाचे योग्य तिकीट काढण्यासाठी रेल्वेस्थानकावर एक तास अगोदर पाेहचून प्रवासी रांगेत उभे राहून तिकीट मिळवतात. तासन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. यातून आता प्रवाशांची सुटका होणार असून घर बसल्याच तिकीट काढण्याची सुविधा रेल्वे विभागाने मोबाइलच्या माध्यमातून सुरु केली आहे.
बदलत्या काळानुरुप रेल्वे हायटेक होत आहे. त्यात आता आणखी भर पडली असून जनरल तिकीट देखील ऑनलाइन पद्धतीने काढता येणार असल्याने हा निर्णय प्रवाशांसाठी सोयीचा ठरणार आहे.
वाशिम स्थानकावर मदत केंद्र -
मोबाइलवर ॲपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट कसे बुक करावे, याबाबत प्रवाशांना माहिती देण्यासाठी वाशिम रेल्वेस्थानकावर मदत केंद्र उभारण्यात आले आहे. गर्दीच्या वेळी या ठिकाणी प्रवाशांना माहिती देऊन ऑनलाइन तिकीट काढण्याबाबत प्रेरित केले जात आहे. यासाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रवीण पवार, बुंकिग ऑफीस प्रमुख कांबळे, अजय कुमार यांच्यासह वाणिज्य विभागाचे सर्व कर्मचारी प्रवाशांना माहिती देण्यासाठी मदत केंद्रावर कार्यरत राहत आहेत.
मोबाइलवरच मिळणार तिकीट
रेल्वे विभागाने विकसीत केलेले युटीस ॲप डाऊनलोड केल्यानंतर यावर मोफत नोंदणी करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट, सीजन तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, काढता येणार आहे. सीजन तिकीटासाठी आता दहा दिवसापूर्वी बुकींग करता येणार आहे. योग्य प्रवासाचे तिकीट काढल्यानंतर ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर मोबाइलवर तिकीट तयार होईल हे तिकीट प्रवासादरम्यान तिकीट निरीक्षकाला दाखवता येणार आहे.
प्रवाशांची रांगेतून सुटका व्हावी, यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने ॲप विकसित केले आहे. त्यामाध्यमातून प्रवाशांनी जनरल तिकीट घर बसल्या काढता येणार आहे. याबाबत वाशिम रेल्वे स्थानकावर प्रवाशांना माहिती दिली जात आहे. अधिक माहितीसाठी १३९ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा- प्रवीण पवार, मुख्य वाणिज्य विभाग प्रमुख, वाशिम