दरवर्षी सरकारकडून बँकांना शेतकऱ्यांना पीककर्जाचे अधिकाधिक वाटप करावे, म्हणून आदेश दिले जातात. मात्र, सहकारी बँका वगळता खासगी आणि व्यापारी बँकाकंडून शेतकऱ्यांना पीककर्ज देताना टाळाटाळ केली जाते. यंदाही असेच चित्र पाहायला मिळाले आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी खासगी आणि व्यापारी बँकांचे उंबरठे झिजवायला लागत असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
००००००००००००००००००००
१०२५ कोटींच्या उद्दिष्टांपैकी ८४३ कोटींचे वाटप
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात १०२५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. दरम्यान, १८ सप्टेंबर अखेर १ लाख ९८ शेतकऱ्यांना ८४३ कोटी ६० लाख ६८ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित होऊ शकले आहे.
००००००००००००००००
सहकारी बँकांकडून उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वाटप
एकिकडे खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँका पीककर्ज वितरणात उदासीन असताना वाशिम जिल्ह्यात विदर्भ ग्रामीण कोकण आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या १०३ टक्क्यांहून अधिक पीक कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे.
००००००००००००००००००००
राष्ट्रीयीकृत बँकांवर शेतकऱ्यांचा संताप
पीककर्ज वितरणात सहकारी बँकांपाठोपाठ खासगी बँकांनी निर्धारित उद्दिष्टाच्या ९३.८९ टक्के पीककर्जाचे वितरण केले आहे. तथापि, राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वाटपाचे प्रमाण ७९.८४ टक्केच आहे. या बँकांचे उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
०००००००००००००००००००
खरीप पीककर्ज वितरणाची स्थिती
निर्धारित उद्दिष्ट - १०२५ कोटी
पात्र शेतकरी संख्या - १,०४,७९१
प्रत्यक्ष पीककर्ज वितरण - ८४३६०.६८ (कोटी)
पीकर्जाचा लाभ मिळालेले शेतकरी - १,००,०९८
००००००००००००००००००००
कोट:
खरीप हंगामात बियाणे, खतांसह इतर खर्चासाठी पीककर्ज मिळावे म्हणून बँंकांकडे कामधंदे सोडून येरझाऱ्या घालाव्या लागतात. परंतु, बँका दखल घेत नाहीत. आता खरीप हंगाम उलंगवाडीवर आला आहे. त्यामुळे पीक आल्यावर शेतकऱ्यांना कर्ज देता काय, असा आमचा सवाल आहे.
-नितीन पाटील उपाध्ये,
शेतकरी, काजळेश्वर,
०००००००००००००००००००
कोट: यंदाच्या खरीप हंगामात बँकेकडून पीककर्ज मिळावे, अशी अपेक्षा होती. कागदपत्रांची जुळवाजुळव करून प्रस्तावही सादर केला; परंतु पीककर्ज नाकारण्यात आले. त्यामुळे उसनवार करून पेरणी केली, खते विकत घेतली. आता पीक निघाल्यावर त्याची परतफेड करू.
- अजय ढोक,
शेतकरी, इंझोरी