एकतर्फी आंतरजिल्हा बदलीला नियमबाह्य ‘एनओसी’
By Admin | Published: September 21, 2016 02:15 AM2016-09-21T02:15:08+5:302016-09-21T02:15:08+5:30
वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रकरण गाजले.
वाशिम, दि. २0 - एखाद्या अधिकारी किंवा कर्मचार्यांची चौकशी सुरू असताना, बदलीसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देऊ नये, या नियमाला पायदळी तुडवित जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने एका विस्तार अधिकार्याला (कृषी) एकतर्फी आंतरजिल्हा बदलीसाठी एनओसी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मालेगाव पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी (कृषी) म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकार्याने एकतर्फी आंतरजिल्हा बदलीसाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केला. विशेष म्हणजे या विस्तार अधिकार्यांची बैलजोडी/बैलगाडी खरेदी प्रकरणी चौकशी करण्याची मागणी काही जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत लावून धरली होती. त्या अनुषंगाने कृषी अधिकार्यामार्फत चौकशी सुरू आहे. सदर चौकशी सुरू असल्याने एकतर्फी बदलीसाठी एनओसी देणे नियमात बसणारे नाही. असे असतानाही कृषी विभागाने सामान्य प्रशासन विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकार्यांना अंधारात ठेवून १६ सप्टेंबर रोजी एनओसी बहाल केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी कृषी विकास अधिकारी आबासाहेब धापते यांना विचारले असता, निश्चित माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो, असे धापते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.