वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वेग चांगलाच मंदावला आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. कारंजा तालुक्यात गत १० दिवसात केवळ १४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, या कालावधीत एकाचाही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही.
कारंजा तालुक्यात मे महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता, तर जून महिन्यात कारंजातील एका महिलेचा कोरोनामुळे अकोला येथे मृत्यू झाला होता. त्यानंतर आजपर्यंत कारंजा तालुक्यात १,०८१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यापैकी ३० जणांचा मृत्यू झाला आहे तर १,०५१ लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत तालुका आरोग्य विभागाने व्यापक उपाययोजना सुरू केल्या होत्या. गावागावात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले होते. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण करून त्यांची वेळेत चाचणी करण्यात आली. तालुक्यात सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीय होते; परंतु आरोग्य विभागाची सतर्कता आणि व्यापक उपाययोजनांमुळे तालुक्यातील कोरोना संसर्गावर बहुतांशी प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. आरोग्य विभागाच्या व्यापक उपाययोजनांमुळेच नव्या वर्षात बाधितांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले. त्यातच १ जानेवारी ते १० जानेवारी याकाळात केवळ १४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
------------
नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक
कारंजा तालुक्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वेग मंदावत असला तरी, कोरोनाचा धोका अद्यापही संपलेला नाही. कोरोना संसर्गावर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आणि नाकातोंडाला मास्क बांधूनच वावरणे आवश्यक आहे. तालुक्यातील नागरिकांनी ही काळजी घेणे आवश्यक आहे. नियमांचे पालन करून स्वत:ला आणि समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी उपरोक्त बाबी आवर्जून कराव्यात, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव यांनी केले आहे.