लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आजमितीस जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. सहाही तालुक्यात हजारांवर हॉटेल्स आणि खानावळी सुरू आहेत. त्याठिकाणी मिळणारे अन्नपदार्थ खाण्यायोग्य आहेत का, हे कधीही तपासले जात नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, असे असताना हॉटेल्स, खानावळींची तपासणी करण्याची जबाबदारी केवळ २ अन्न निरीक्षकांच्या खांद्यावर सोपविण्यात आलेली आहे.
विविध आजारांमधील रुग्णांना उत्तम प्रतीचे औषध मिळण्यासह भेसळमुक्त सौंदर्य प्रसाधने आणि सुरक्षित तथा आरोग्यदायी अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात १९७२पासून अन्न व औषध प्रशासन विभागाचे कामकाज सुरू झाले. या अंतर्गत जिल्हा स्तरावर अन्न निरीक्षक व औषध निरीक्षक अशी पदे निर्माण करून त्यांच्यावर अन्न व औषधे दर्जेदार आहेत का, हे तपासण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात मात्र वाशिमला जिल्ह्याचा दर्जा मिळून २२ वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही जिल्ह्यात अद्यापपर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाचे स्वतंत्र कार्यालयच सुरू झालेले नाही. त्यातही गंभीर बाब म्हणजे अन्न निरीक्षक म्हणून वाशिम, मालेगाव आणि रिसोड या तीन तालुक्यांसाठी नीलेश ताथोड; तर मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या तीन तालुक्यांसाठी आर. डी. कोकडवार या केवळ दोन कर्मचाऱ्यांकडे कारभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडून सहाही तालुक्यातील हॉटेल्स, खानावळींची तपासणीच होत नसून, नियमांची मोडतोड करणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण नसल्यातच जमा आहे. यामुळे अन्न सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
......................................
बॉक्स :
जिल्ह्यात ५५० मेडिकल्स; तपासणीत गौडबंगाल
जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये ५५०पेक्षा अधिक मेडिकल्स सुरू आहेत. त्याठिकाणी वेळोवेळी भेट देऊन औषधांचा दर्जा तपासण्याची जबाबदारी औषध निरीक्षकांची असते; परंतु जिल्ह्यासाठी मेटकर आणि राठोड हे केवळ २ औषध निरीक्षक असल्याने बहुतांश मेडिकल्सची तपासणीच होत नाही. ज्याठिकाणी तपासणी केली जाते, तिथे गौडबंगालच अधिक असते. यामुळे जनतेच्या थेट आरोग्याशी निगडीत औषधांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
....................................
११ लाख
जिल्ह्याची लोकसंख्या
१,७३०
हॉटेल्स आणि खानावळी
५५०
जिल्ह्यात मेडिकल्स
२
अन्न निरीक्षक कार्यरत
२
औषध निरीक्षक कार्यरत
......................................
कोट :
वाशिम जिल्ह्यात २ अन्न निरीक्षक आणि २ औषध निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हॉटेल्स, खानावळी, मेडिकल्सची वेळोवेळी तपासणी करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत; मात्र लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांचे प्रमाण अगदीच कमी असल्याने कामकाज प्रभावित होत आहे. ही पदे वाढविण्यासंदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
- सागर टेरकर
सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन