- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दुसऱ्या लाटेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना अधिक प्रमाणात कोरोना संसर्ग झालेला असताना, नेमके याच वयोगटातील नागरिकांचे लसीकरण गत एका महिन्यापासून थांबले आहे. २१ जूननंतर या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पूर्ववत होण्याचे संकेत आहेत. त्यादृष्टीने आरोग्य विभागातर्फे नियोजन केले जात आहे.जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे या महिन्यात जनजीवन प्रभावित झाले होते. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याला सुरुवात झाली. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला जेमतेम १५ दिवस होत नाहीत, तोच लसींचा तुटवडा असल्याचे कारण समोर करून शासनस्तरावरून या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जिल्ह्यात ३२ हजार ९१९ कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १९ हजारांवर रुग्ण हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत. कोरोनावर लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे, तर दुसरीकडे सर्वाधिक बाधित झालेल्या वयोगटातील लसीकरण अद्यापही सुरू झाले नसल्याने युवकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे जवळपास ४५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण २१ जूनपासून सुरू होण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे जवळपास ४५ टक्के लसीकरण झाले आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण २१ जूननंतर सुरू करण्याचे नियोजन वरिष्ठस्तरावर सुरू असल्याचे समजते. वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व पुढील आदेशानुसार जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येईल.- डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम