ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी दाखल झाले केवळ दोन उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:40 PM2019-11-19T12:40:46+5:302019-11-19T12:40:52+5:30

वाशिम आणि मानोरा या दोनच तालुक्यातून प्रत्येक एक याप्रमाणे केवळ दोन अर्ज दाखल झाले आहेत.

Only two candidates have filed for Gram Panchayat polls | ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी दाखल झाले केवळ दोन उमेदवारी अर्ज

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी दाखल झाले केवळ दोन उमेदवारी अर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १८८ ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्यपदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतीम मुदत तीन दिवसांवर (२१ नोव्हेंबर) येऊन ठेपली आहे. असे असताना १८ नोव्हेंबरअखेर वाशिम आणि मानोरा या दोनच तालुक्यातून प्रत्येक एक याप्रमाणे केवळ दोन अर्ज दाखल झाले आहेत.
पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार १६ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत इच्छूक उमेदवारांकडून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये नामनिर्देशनपत्र स्विकारले जात आहे. प्राप्त होणाऱ्या नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याचदिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास ८ डिसेंबर २०१९ रोजी मतदान घेण्यात येईल. मतमोजणी ९ डिसेंबर २०१९ रोजी होईल व १२ डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असा पोटनिवडणूकीचा एकंदरित कार्यक्रम आहे.
दरम्यान, वाशिम तालुक्यातील थेट सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये गोंडेगाव ग्रामपंचायतीचा समावेश असून सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये तांदळी बु., वारा जहांगीर, सावंगा जहांगीर, ब्रह्मा, किनखेडा, तोरणाळा, अनसिंग, पिंपळगाव, वाळकी जहांगीर, काजळंबा, वारला, अंजनखेडा, सोनखास, घोटा, हिस्सेबोराळा, सावरगावबर्डे, शेलगाव, असोला जहांगीर, चिखली बु. कार्ली, शेलू बु., नागठाणा, फाळेगाव थेट, सोंडा, सुकळी, ढिल्ली, हिवरा रोहिला, उमरा कापसे, टनका, सूपखेला, देवठाणा या ३१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
२१ नोव्हेंबर ही नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतीम मुदत असताना १८ नोव्हेंबरपर्यंत मात्र वाशिम आणि मानोरा या दोन तालुक्यांमधून प्रत्येक एकाच उमेदवाराचा अर्ज दाखल झाला होता. हा अपवाद वगळता उर्वरित एकाही ग्रामपंचायतीतून नामनिर्देशनपत्र सादर झाले नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

उमेदवारी अर्जांच्या बाबतीत चार तालुके निरंक
ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता २१ नोव्हेंबर ही अंतीम मुदत आहे. असे असताना १८ नोव्हेंबरअखेर केवळ दोनच तालुक्यातून ते ही दोनच अर्ज दाखल झाले. अन्य चार तालुके या प्रक्रियेबाबत निरंकच असल्याचे दिसून येत आहे. रिसोड तालुक्यातील ४१, मंगरूळपीर तालुक्यातील १९, मालेगाव तालुक्यातील २४ आणि कारंजा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायत क्षेत्रात पोटनिवडणूक होत असताना शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

Web Title: Only two candidates have filed for Gram Panchayat polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.