वाशिम जिल्हा रुग्णालयात मौखिक तपासणी, नेत्र चिकित्सा कक्षाची सुविधा !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 01:58 PM2017-12-03T13:58:48+5:302017-12-03T13:59:06+5:30
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र मौखिक तपासणी कक्षाची सुविधा उपलब्ध केली असून, २ डिसेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत या कक्षाचे उद्घाटन झाले.
वाशिम - जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र मौखिक तपासणी कक्षाची सुविधा उपलब्ध केली असून, २ डिसेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत या कक्षाचे उद्घाटन झाले. तसेच मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत नेत्र चिकित्सा कक्ष सुसज्ज ठेवण्यात आला.
कार्यक्रमाला खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती सुधीर गोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, वाशिमचे उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, वाशिम नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा समितीचे सभापती राहुल तुपसांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जे. एम. जांभरुणकर, डॉ. अनिल कावरखे आदी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मौखिक आरोग्य तपासणी मोहिम १ डिसेंबरपासून हाती घेतली आहे. याअंतर्गत ३० वर्षांवरील व्यक्तींची मौखिक तपासणी व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणा-या दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष महिमेचा तसेच मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ २ डिसेंबरला करण्यात आला. यावेळी खासदार गवळी म्हणाल्या की, आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आपल्याला आजार होऊ नये, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्या आरोग्यासाठी काय खावे, काय खाऊ नये? याबाबत प्रत्येकाने दक्ष असावे, असे आवाहन गवळी यांनी केले.
आमदार पाटणी म्हणाले, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण युवकांमध्ये अधिक आहे. महाविद्यालयातील विद्यार्थीही गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना दिसतात. याविषयी पालकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणा-या दुष्परिणामांची माहिती लोकांना देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राऊत यांनी तर संचालन नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. जगदीश बाहेकर यांनी केले.