वाशिम जिल्ह्यात सहा दिवसांत कोरोना बाधित रुग्णसंख्या ९०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 12:37 PM2021-02-27T12:37:52+5:302021-02-27T12:38:02+5:30

CoronaVirus News काही दिवसांपासून रिक्त झालेले कोविड केअर सेंटरमधील बेडही हाऊसफुल्ल होत असल्याचे दिसून येत आहे.

Over 600 corona-infected patients in six days | वाशिम जिल्ह्यात सहा दिवसांत कोरोना बाधित रुग्णसंख्या ९०० पार

वाशिम जिल्ह्यात सहा दिवसांत कोरोना बाधित रुग्णसंख्या ९०० पार

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे  संकट अधिक तीव्र झाले असून गेल्या सहा दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ९०० चा आकडा ओलांडला आहे. यामुळे काही दिवसांपासून रिक्त झालेले कोविड केअर सेंटरमधील बेडही हाऊसफुल्ल होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून डिसेंबर २०२० अखेर कोरोना रुग्णांचा आकडा सहा हजार ६६३ वर पोहोचला होता. दरम्यान, नव्या वर्षातील पहिल्या जानेवारी महिन्यात कोरोनाचे नवे ५०६ रुग्ण आढळले. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हे प्रमाण काहीसे कमी होऊन १५० च्या आसपास रुग्णसंख्या झाली; मात्र १४ फेब्रुवारीपासून सातत्याने रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १४ ते २० फेब्रुवारी या सात दिवसांत ३५८; तर २१ ते २७ फेब्रुवारी या सात दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल ९७३ ने वाढलेली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्ण तयारीनिशी पुन्हा सज्ज झाली असून कुलूपबंद कोविड केअर सेंटरही सुरू झाले आहेत. रुग्णवाढीचा हा वेग यापुढील काही दिवस असाच कायम राहणार असल्याने नागरिकांनी कुठलाही धोका न पत्करता तोंडाला मास्क लावणे, सामाजिक व शारीरिक अंतर राखणे, स्वच्छतेचे निकष पाळून  कोरोनापासून रक्षण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.


१०७० कोरोना बाधीत गृह विलगीकरणात
कोविड केअर सेंटर आणि विविध शासकीय रुग्णालयांमध्ये ३५५ कोरोना बाधीत रुग्ण उपचारार्थ दाखल असून १०७० जण गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. या रुग्णांवरही आरोग्य विभाग विशेष ‘वॉच’ ठेऊन असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काही रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवले जात असून आवश्यक त्याठिकाणी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णभरती करून घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट तीव्र होत असून नागरिकांनी सर्वतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

Web Title: Over 600 corona-infected patients in six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.