नंदकिशोर नारे
वाशिम : शहराबाहेर कामानिमित्त गेलेल्यांचे आई -वडील, निराधार वृद्धांची देखभालीसाठी पाेलीस विभागाचे पथक असून, या पथकावर पाेलीस अधीक्षकांचे वाॅच दिसून येत आहे.
जिल्ह्यात एकटे राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी पाेलीस विभागाने पुढाकार घेतला असून, याकरिता शहरात फिरणाऱ्या निर्भया पथकाकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. निर्भया पथकातील महिला पाेलीस कर्मचारी दरराेज विविध भागांत एकट्या राहणाऱ्या वृद्धांच्या घरी जाऊन, त्यांना लागत असणाऱ्या साहित्यासह अडीअडचणी विचारण्याचे कार्य करीत आहे. विशेष म्हणजे, खुद्द पाेलीस अधीक्षक दर दाेन तीन दिवसांआड याचा आढावा घेत असून, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देत आहेत.
-----------
पाेलीस अधीक्षक कार्यालयात सर्व वृद्धांची नाेंद
वाशिम शहरात एकटे राहणाऱ्या वृद्धांची पाेलीस अधीक्षक कार्यालयात नाेंद आहे. या वृद्धांची एक यादी तयार करून, निर्भया पथकाला देण्यात आली आहे. विविध भागांत राहणाऱ्या वृद्धांच्या घरी आलटूनपालटून भेट देण्याचे पाेलीस अधीक्षकांनी सूचित केल्यानुसार, पथकातील पाेलीस कर्मचारी वृद्धांची चाैकशी करीत आहेत. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या साेडविण्याचा प्रयत्नही पाेलीस विभागाकडून केला जात आहे.
वाशिम शहरासाेबतच जिल्ह्यात असलेल्या १३ पाेलीस ठाण्यांतर्गत एकट्या राहणाऱ्या वृद्धांची काळजी घेण्याबाबत ठाणेदारांना पाेलीस अधीक्षकांनी सूचित केले आहे. विशेष म्हणजे, काेराेना काळात जिल्ह्यातील सर्वच पाेलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या गावातील वृद्ध, निराधारांना धान्यासह आवश्यक वस्तूंचे वाटप पाेलीस अधीक्षक वसंत परदेसी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले हाेते.
-------------
काेराेना काळात वृद्धांकडे विशेष लक्ष
शहरातील अनेक वृद्धांना विविध आजार असल्याने दैनंदिन औषधी सुरू आहेत. याकरिता पाेलीस विभागाने या बाबीकडे विशेष लक्ष काेराेनाच्या काळात पुरविले हाेते.
-----
दर एक-दाेन दिवसांत विचारपूस
पाेलीस अधीक्षकांनी दिलेल्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली जात आहे. काही अडचण असल्यास त्यांचे माेबाइल नंबरही आमच्याकडे दिलेले आहेत.
- नारायण व शांताबाई थाेरात, वाशिम
आठवड्यात एक ते दाेन वेळा निर्भया पथक येऊन अडीअडचणी बाबत विचारपूस करत आहेत. काही समस्या असल्यास साेडविण्यासाठी पुढाकारही घेतात.
- गणपत व रत्नमालाबाई उबाळे, वाशिम.
-------
जिल्ह्यात आल्याबराेबर वृद्धांसाठी विशेष उपक्रम राबविला
वाशिम जिल्ह्यात रुजू झाल्याबराेबर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसाेबतच सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी पाेलीस विभागाने प्रयत्न केले. यामध्ये वृद्धाची देखभालीची जबाबदारीही देण्यात आली आहे.
- वसंत परदेसी, पाेलीस अधीक्षक, वाशिम.
--------
जिल्ह्यातील पोलीस ठाणे १३
पोलीस अधिकारी ८९
पोलीस १३९८
जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक वयाची लोकसंख्या - १,८५,०००