खाकसाची शेती करण्यास परवानगी देण्याचा ठराव पारित
By admin | Published: September 24, 2016 02:12 AM2016-09-24T02:12:26+5:302016-09-24T02:18:58+5:30
वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत खाकसाची शेतीचा प्रस्तावासह समृद्धी महामार्गाला विरोध करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
वाशिम, दि. २३- शेतकर्यांना शेतीतून अधिकाधिक उत्पादन हाती यावी, यासाठी शासनाने खाकसाची (खसखस) शेती करण्याची परवानगी द्यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. याला बहुतेक सर्व सदस्यांनी सहमती दर्शविली. २२ सप्टेंबर रोजीची उर्वरित सभा शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती सुधीर गोळे, विश्वनाथ सानप, पानुबाई जाधव, यमुनाबाई जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाचा विषय काही सदस्यांनी उपस्थित केला. या महामार्गाला जिल्ह्यातील शेतकर्यांचा तीव्र विरोध असल्याने शासनाने शेतकर्यांच्या भावना विचारात घ्याव्या, असे मत सदस्यांनी सभागृहात मांडले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी शेतकर्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी शासनाने खाकसाची (खसखस) शेती करण्याची परवानगी द्यावी, असा ठराव मांडला. त्याला जि.प. सदस्य गजानन अमदाबादकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी सभागृहात चर्चा झाली. शासन निर्देशानुसार खाकसाची शेती ही अफूची शेती ठरत असल्याने ती बेकायदेशीर असल्याचे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद यांनी व्यक्त केले. तेव्हा उपस्थित सदस्यांनी याला आक्षेप घेतला. दारू ही मोह, अंगूर, संत्रा आदी अनेक झाडांपासून बनते. या झाडांना दारूचे झाड म्हणत नाहीत, मग खाकसाच्या झाडालाच अफूचे झाड का म्हणता, असा सवाल अमदाबादकर यांनी केला. दीर्घ चर्चा झाल्यानंतर याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी सुभाष शिंदे यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेत होत आहे का? याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी केली. अंमलबजावणी होत नसेल तर या शासन निर्णयाची जिल्हा परिषदेसमोर होळी का करण्यात येऊ नये, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.
लघुसिंचन, समाजकल्याण, कृषी, घरकुल आदी विषयांवरही या सभेमध्ये चर्चा करण्यात आली. सभेचे संचालन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी केले. चंद्रकांत ठाकरे, विश्वनाथ सानप, सुधीर गोळे, हेमेंद्र ठाकरे, चक्रधर गोटे, उस्मान गारवे, सुभाष शिंदे, गजानन अमदाबादकर, स्वप्निल सरनाईक, विकास गवळी, ज्योती गणेशपुरे, श्याम बढे, अनिल कांबळे यांच्यासह अनेक सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. सभेला विभागप्रमुखांसह जिल्हा परिषद सदस्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.