परवानगी नसतानाही ऑटोतून प्रवासी वाहतूक सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:24 AM2020-05-06T10:24:29+5:302020-05-06T10:24:35+5:30
खासगी आॅटोंव्दारे ग्रामीण भागातून प्रवाशांची ने-आण सुरू असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्याचा समावेश ‘ग्रीन झोन’मध्ये असल्याने ४ मे पासून जिल्हा प्रशासनाकडून ‘लॉकडाऊन’ कायम ठेवत काही सेवा, सवलती प्रदान करण्यात आल्या; मात्र खबरदारीच्या दृष्टीकोणातून पुढील आदेशापर्यंत सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहतूकीची सर्व साधने, आॅटोरिक्षासह बसेस बंद राहतील अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना खासगी आॅटोंव्दारे ग्रामीण भागातून प्रवाशांची ने-आण सुरू असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. वाशिमपासून ८० किलोमिटर अंतरावर असलेल्या अकोला जिल्ह्यात कोरोनाचे ७५ रुग्ण आढळले असून ५० किलोमिटर अंतरावर असलेल्या हिंगोली जिल्ह्यात रुग्णांचा आकडा ८९ वर पोहचला आहे. बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या शेजारच्या जिल्ह्यांमध्येही कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने शेजारच्या पाचही जिल्ह्यांच्या सिमा बंद केल्या असून ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार करून त्यावर पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे. असे असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शहरांमध्ये खासगी आॅटो, अॅपेच्या माध्यमातून ग्रामीण प्रवाशांची ने-आण करण्याचा गंभीर प्रकार राजरोस घडत आहे. नियमबाह्य घडत असलेल्या या प्रकारावर प्रशासनाने तत्काळ नियंत्रण मिळवावे, अशी मागणी होत आहे.
सकाळच्या सुमारास होतेय वाहनांची तोबा गर्दी
ग्रीन झोनमध्ये समावेश असलेल्या वाशिम जिल्ह्यात ४ मे पासून सकाळी ८ ते २ या वेळेत सर्वच प्रकारची दुकाने खुली ठेवण्यास मुभा मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातूनही खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत असून वाहनांची तोबा गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
पाचपेक्षा अधिक प्रवासी; पोलिसांचे दुर्लक्ष
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू केलेल्या नियमांमध्ये चारचाकी वाहनात दोनपेक्षा अधिक प्रवासी नको, असा नियम आहे; मात्र खासगी आॅटोंमध्ये पाचपेक्षा अधिक लोक बसून प्रवास करित आहेत. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येत नाही किंवा त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे, असा सवाल यानिमित्ताने सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
आॅटोचालकांनीही खबरदारी घेण्याची गरज
आॅटोमधून प्रवास करणाऱ्यांपैकी एखाद्या प्रवाशात कोरोनाची लक्षणे असल्यास सहप्रवाशांसोबतच आॅटोचालकांनाही गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे पुढील काही दिवस आॅटोचालकांनीही खबरदारी घेण्याची गरज असल्याचा सूर उमटत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने विविध स्वरूपातील उपाययोजना अंमलात आणल्या. सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहतूकीची सर्व साधणे, आॅटोरिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याऊपरही असा प्रकार घडत असल्यास कारवाई केली जाईल.
- ह्रषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम