वाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण असले तरी यापेक्षा अधिक संख्येने महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. एकूण सदस्य संख्येच्या जवळपास ५४ टक्के महिला ग्रामपंचायतींच्या सत्तेत पोहोचल्या आहेत.
अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने चमकदार कामगिरी करीत आहेत. राजकारणातही महिला सक्रिय होत असून, ग्रामपंचायतमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. जिल्ह्यात १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी निवडणूक झाली. जवळपास ५४ टक्के महिला निवडून आल्या असून, ही संख्या ६६५च्या घरात जाते. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ५० टक्के महिला सरपंचपदी विराजमान होतील.
००
रिसोड, कारंजा तालुक्यात महिलांचे प्रमाण जास्त
ग्रामपंचायत निवडणुकीत रिसोड, कारंजा तालुक्यात महिला उमेदवारांचा प्रमाण अधिक आहे. काही ठिकाणी महिलांसाठी आरक्षण नसतानाही सर्वसाधारण प्रवर्गातून महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यामुळे ५० टक्के आरक्षणापेक्षा अधिक संख्येने महिला विजयी झाल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास साधण्याला प्राधान्य देऊ, असा सूर महिला उमेदवारांमधून उमटला.
००
गाव विकासाबरोबरच महिलांच्या समस्याही सोडविणार
विविध क्षेत्रात महिलादेखील चांगली कामगिरी करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण असून, राजकीय क्षेत्रातही महिला समाेर येत आहेत. मतदारांनी विश्वास टाकून निवडून दिले आहेत. हा विश्वास सार्थ ठरवून गाव विकासासाठी प्रयत्न केला जाईल. महिलांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविता येतील का? या दृष्टिकोनातूनही नियोजन केले जाईल.
- दुर्गा विलास खोरणे, सदस्य, ग्रामपंचायत
००
राजकीय क्षेत्रातही महिलांची टक्केवारी वाढत आहे. महिला सक्षमीकरणासाठी शासनाकडून विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात महिलांसाठी विशेष उपक्रम राबविता येईल का? यासाठी प्रयत्न करण्यात येतील. बचत गटाच्या माध्यमातूनही महिलांचा विकास साधण्याला प्राधान्य देण्यात येईल.
- संतुबाई बाबुराव वानखडे, सदस्य, ग्रामपंचायत
००
गावातील समस्या सोडवून मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्यात येईल. महिला सदस्य म्हणून महिलांच्या प्रश्नांना, महिलांच्या समस्यांचा वाचा फोडून महिलांसाठी विशेष उपक्रम राबविण्याचा मानस आहे. ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या निधीपैकी काही टक्के निधी हा महिलांच्या कल्याणासाठी कसा वापरता येईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल.
- शाहिस्ता बी शेख रऊफ, सदस्य, ग्रामपंचायत