लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी : मेडशी येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गाव सील केले असून, रुग्ण आढळून आलेल्या भागात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले. ६ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी मेडशीचा आढावा घेतला असून, कुणीही घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या.कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता मेडशी गावावर आरोग्य विभागासह पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. ३ एप्रिलपासून घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्यावतीने सर्वे केला जात असून, सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या. मेडशी येथे निर्जंतुकीकरण केले असून, गावात तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष बोरसे, तालुका समूह संघटक मोहम्मद नूर, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक मोहम्मद अनिस कुरेशी, फड, संतोष घूले, आरोग्य सेविका बोदवडे, आशा स्वयंसेविका प्रमिला राठोड, विद्या चव्हाण, कांचन सावळे, मीनाक्षी पट्टेबहादूर आदींनी गावकºयांची माहिती संकलित केली. दुसरीकडे गावातून बाहेर कुणी जाणार नाही यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रुग्ण आढळून आलेला तो भाग सील करण्यात आला असून, तेथे पोलीस कर्मचारी तैनात केले. येथे खडा पहारा दिला जात आहे. घराबाहेर पडल्यास पोलीस कारवाईमेडशी गावातील परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाला घरातच राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. याऊपरही कुणी घराबाहेर पडून गर्दी करीत असेल तर पोलीस प्रशासनातर्फे कारवाई केली जाणार आहे. कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जा, असा इशारा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिला.
मेडशी येथे पोलीस बंदोबस्त; पोलिस अधीक्षकांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 10:48 AM