दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगरपालिकेकडून शहरात मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात येतात. त्यानुसार, याहीवर्षी शहरात विविध ठिकाणी असलेले पाच मोठे नाले स्वच्छ करण्यात आले आहेत. याचबरोबर नदीकाठी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे झाडाला लागणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या विद्युततारांमुळे काही अनुचित घटना घटना घडू नये, यासाठी झाडाच्या फांद्या तोडण्यात येऊन जीर्ण झालेल्या इमारतीची पाहणी करण्यात आली. नदीकाठच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पूरसदृश स्थिती उद्भवल्यास सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेच्या फंडातून दीड लाख रुपये रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
............................
कोट :
नगरपालिकेकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वीच बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळेच १० जून रोजी शहरात तब्बल ९० मिलिमीटर पाऊस होऊनही पुढील एकाच तासात संपूर्ण पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाला. मान्सूनपूर्व कामांकरिता शासनाकडून स्वतंत्र निधी मिळत नसल्याने ही कामे पालिका फंडातून करण्यात आली आहेत.
- राजेश संगत
आरोग्य निरीक्षक, नगरपरिषद मंगरूळपीर