वाशिम : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, ही लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पूर्वतयारी केली जात आहे. तालुकास्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्लांट प्रस्तावित असून, जिल्हा कोविड हॉस्पिटल तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन बेडही वाढणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या पडत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता सरकारी आरोग्यविषयक सुविधादेखील हळूहळू उपलब्ध होत असून, जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. अशातच तीन ते चार महिन्यांनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. ही शक्यता गृहीत धरून जिल्ह्यात उपाययोजना केल्या जात आहेत. वाशिम व कारंजा येथे अनुक्रमे ७५ व ५० ऑक्सिजन खाटा वाढविण्याचे नियोजन आहे. याशिवाय तालुकास्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचे प्रस्तावित आहे.संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन निर्मिती प्लांट, कोविड केअर सेंटर आदींचे नियोजन केले जात आहे.-डॉ. मधुकर राठोड,जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.
तिसरी लाट रोखण्यासाठी पूर्वतयारी; तालुकास्तरावर ऑक्सिजन प्लांट प्रस्तावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 11:45 AM