मतदार नोंदणी पुनरिक्षणांतर्गत मुख्याध्यापक, प्राचार्यांची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 06:21 PM2018-10-16T18:21:18+5:302018-10-16T18:21:30+5:30
वाशिम: मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोंबर २०१८ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, मयत व दुबार मतदारांची नावे वगळण्याची मोहीम सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोंबर २०१८ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, मयत व दुबार मतदारांची नावे वगळण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या कार्यशाळेचे आयोजन नियोजन भवन येथे १६ आॅक्टोबरला करण्यात आले. यावेळी सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्याथ्यार्चे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट होणे आवश्यक असून याकरिता संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मतदार साक्षरता क्लबच्या माध्यमातून या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश्वर हांडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, उत्तम फड, महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नवीन मतदार नोंदणी, महाराष्ट्र हरित सेना नोंदणी यासह पोक्सो कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायदा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १२ हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली असून उर्वरित सर्व पात्र उमेदवारांची नावे मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या व वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्याथ्यार्चे नाव मतदार यादीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित प्राचार्यांनी महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मतदार साक्षरता क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.