- ओम वलोकार
कोठारी (वाशिम) : गुरांना चारा व्हावा उपलब्ध व्हावा आणि उत्पन्नही घेता यावे, या उद्देशाने रब्बी हंगामात अवघ्या साडे तीन एकर क्षेत्रात पेरलेल्या ज्वारीतून ६५ क्विंटलचे उत्पन्न झाले. ही किमया मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा येथील शेतकरी नारायण ठाकरे यांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र आता नावालाच उरले आहे; परंतु खरीप हंगामात पावसाळ्याच्या सुरुवातीची अनियमितता आणि नंतर अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मुग, उडीद आदि पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उत्पन्न काही झाले नाहीच शिवाय गुरांसाठी चाराही राहिला नाही. त्यामुळे पशूपालक शेतकरी अडचणीत सापडले होते. बोरव्हा येथील शेतकरी नारायणठाकरे यांच्यापुढेही हीच समस्या होती. त्यावर उपाय म्हणून त्यांनी रब्बी हंगामात ज्वारी पेरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आपल्या एकूण शेतीपैकी केवळ साडे तीन एकर क्षेत्रात रब्बी ज्वारीची पेरणी केली. इतर पिकांच्या तुलनेत ज्वारीसाठी पोषक वातावरण असतानाच त्यांनी या पिकाचे योग्य व्यवस्थापन केले. शिवाय रखवाली करून वन्यप्राण्यांपासून हे पीक वाचविले. या पिकातून साधारण ३५ ते ४० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा त्यांना होती; परंतु त्यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे एवढ्याच क्षेत्रात एकरी १९ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन झाले असून, साडे तीन एकरात मिळून त्यांना ६५ क्विंटल ज्वारीचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे गुरांच्या चाºयाची समस्याही मिटली आहे.