लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतात विशेषत: महाराष्ट्रातही झपाट्याने पाय पसरले आहेत. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली असून इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शाळा थेट २६ जूनलाच सुरू होणार आहेत. यादरम्यान विद्यार्थ्यांची 'लिंक' तुटू नये, यासाठी बहुतांश खासगी शाळांनी आॅनलाईन शिक्षण देणे सुरू केले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐन परीक्षेच्या काळात कोरोना विषाणूचे संकट उद्भवल्याने संचारबंदी लागू होऊन संपूर्ण महाराष्ट्र 'लॉक डाउन' होण्यासोबतच शाळाही बंद कराव्या लागल्या. दरम्यान, राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच असून शाळा आता थेट २६ जूनलाच सुरू होणार आहेत. यामुळे इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करून आरटीई धोरणानुसार विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. विद्यार्थीशिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहावे, यासाठी बहुतांश खासगी शाळांनी व्हॉट्सअपच्या आधारे आॅनलाईन पध्दत अंगीकारुन शिक्षण देणे सुरू केले आहे. यामुळे विद्याथीर्ही घरी असले तरी अभ्यासात गुंतल्याचे दिसून येत आहे.जिल्हा परिषद शाळा आॅनलाईनपासून दूरच!कोरोनाच्या संकट काळात खासगी शाळांनी आॅनलाईनची कास धरली असताना जिल्हा परिषद शाळा मात्र यापासून दूरच आहेत, शिवाय इयत्ता नववी आणि अकरावीची परीक्षा होणार किंवा कसे याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालक संभ्रमात सापडले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र 'लॉक डाउन' आहे. यादरम्यान विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कायम टिकून रहावे, त्यांचे लक्ष विचलित होऊ नये, यासाठी काही खासगी शाळांनी आॅनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला, तो कौतुकास्पद आहे.- अंबादास मानकरप्राथमिक शिक्षणाधिकारी, वाशिम