वाशिम : कोरोना विषाणूच्या संकटामुळे गेल्या सव्वावर्षापासून बंद असलेली पूर्णा- अकोला- पूर्णा ही पॅसेंजर रेल्वे १९ जुलैपासून धावणार आहे. यामुळे वाशिम जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
वाशिममार्गे परराज्यात, तसेच राज्यातील अन्य महानगरांत जाण्याकरिता दळणवळणाच्या फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. हळूहळू रेल्वे सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यातही कोरोनाकाळात पॅसेंजर रेल्वे बंदच आहेत. एक्स्प्रेस सुरू आहेत. मात्र, पॅसेंजर बंद असल्याने गोरगरीब प्रवाशांची परवड होत आहे. एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आरक्षणासह तिकीट जास्त असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना आर्थिक भुर्दंडासह आरक्षण न मिळाल्यास त्रास सहन करावा लागत होता. ८ जुलै २०२१ रोजी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक उपेंद्र सिंग हे वाशिम येथे आले असता सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना आरक्षण नसल्यामुळे त्रास होत असून, अनारक्षित प्रवासी पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचे निवेदन खासदार भावना गवळी यांनी दिले होते, तसेच यानंतरही पाठपुरावा केला होता. व्यापारी मंडळानेदेखील निवेदन दिले हाेते. खासदार गवळी यांच्या मागणीनुसार १९ जुलै २०२१ पासून अनारक्षित पूर्णा- अकोला- पूर्णा दिवसा चालणारी (डेमू) ही रेल्वेगाडी सुरू होत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
०००
...अशी आहे रेल्वेची वेळ
पूर्णा- अकोला ही रेल्वे सकाळी ७ वाजता पूर्णा येथून निघून सकाळी १० वाजता वाशिम येथे पोहोचणार आहे. वाशिमवरून १०.०५ वाजता सुटणार असून, अकोला येथे दुपारी १२.१० वाजता पोहोचेल. अकोला- पूर्णा ही रेल्वे सायंकाळी ४ वाजता अकोला येथून निघून वाशिम येथे सायंकाळी ५.१६ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला हिंगोली ते अकोलादरम्यान नावलगाव, माळशेलू, कनेरगाव नाका, केकतउमरा, वाशिम, जऊळका, अमानवाडी, लोहगड, बार्शिटाकळी, शिवनी शिवापूर व अकोला, असे थांबे आहेत.