शिरपूर जैन या गावाला पर्यटन क्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त आहे. जैन धर्मीयांची काशी म्हणून ओळख असलेल्या या गावातील बसथांबा ते जैन मंदिर, जगदंबा देवी मंदिर, पोलीस स्टेशनपासून जानगीर महाराज संस्थानकडे जाणारा रस्ता, बसथांबा परिसरामागील वाॅर्ड क्रमांक तीनमधील रस्ता, गुजरी चौकातील रस्ता यासह वाॅर्ड क्रमांक सहामधील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे विशेषत: पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांमध्ये साचून राहणाऱ्या पाण्यामुळे वाहनचालकांना अतोनात त्रास सहन करावा लागतो.
गावाचे क्षेत्रफळ, ग्रामपंचायतीचे उत्पन्न तथा थकीत मालमत्ता कराची वसुली लक्षात घेता ग्रामपंचायत स्तरावर गावातील विविध ठिकाणच्या रस्त्यांचा विकास होणे शक्य नाही. यासाठी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व आमदार अमित झनक यांनी विशेष प्रयत्न करून शासनाकडून निधी खेचून आणणे गरजेचे आहे. केंद्रात धोत्रे, तर राज्यात झनक यांच्या पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्र शिरपूरच्या रस्त्यांचा विकास ‘डबल इंजिन’प्रमाणे व्हायला हवा, अशी अपेक्षा शिरपूरच्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
......................
बाॅक्स :
अतिक्रमणाची समस्या ‘जैसे थे’
गेल्या काही वर्षात शिरपूर येथे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्यानेही समस्येत भर पडली. २०१८मध्ये नागपूर उच्च न्यायालयाने ईमदाद बागवान यांनी दाखल केलेली जनहित याचिका निकाली काढताना शिरपूर येथे अतिक्रमण हटवून विकास आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार अतिक्रमण हटविण्यात आले; मात्र परिस्थिती आता पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. गावाचा विकास आराखडा तयार करण्यात आला किंवा नाही हेदेखील अद्याप गुलदस्त्यात आहे.