लोकमत न्यूज नेटवर्कभर जहॉगीर (वाशिम) : येथून जवळच असलेल्या मोप प्राथमिक आरोग्य केंद्रात गत १५ दिवसांपासून रॅबीज लसीचा तुटवडा असल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार घेण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी येथील पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला असून, या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅबीज लस मिळाली नाही.गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावे याकरीता ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. मोप प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत भर जहॉगीर गावासह जवळपास ३० ते ३५ गावांचा समावेश आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर अन्य प्रकारची औषधी उपलब्ध आहे; मात्र कुत्र्याने चावा घेतल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रॅबीज लस उपलब्ध नाही. लसीचा तुटवडा असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. लसीसाठी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, आरोग्य विभागाने त्वरित ही लस उपलब्ध करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांनी शनिवार ३० मे रोजी केली. मोप प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सात ते आठ उपकेंद्र आहेत. या परिसरात सध्या पिसाळलेल्या व भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. शुक्रवारी एकाच दिवशी पाच लोकांना कुत्र्याने चावा घेतला. उपचारार्थ सर्व जण आरोग्य केंद्रात गेले असता, रॅबीज लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. श्वान दंश झाल्यानंतर बचाव करण्यासाठी आरोग्य केंद्र व उपकेंद्रात प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असणे आवश्यक आहे. रिसोड तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात ही लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी औषधी दुकानातून लस विकत घ्यावी लागते. वरिष्ठांकडे मागणी नोंदविली आहेरॅबीज लस ही रिसोडमध्येच उपलब्ध नाही. आरोग्य केंद्र व उपकेंद्रात रॅबीज लस सद्यस्थितीत उपलब्ध नाही. रॅबीज लस उपलब्ध करावी, याकरीता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर तातडीने पुरवठा केला जाईल, असे वरिष्ठांनी सांगितले, अशी माहिती मोप आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर सिंग यांनी दिली.
मोप आरोग्य केंद्रात रॅबीज लसीचा तुटवडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 4:32 PM