वाशिम : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखाळा परिसरातील शंकरबाबा मंदिराजवळ आयपीएल क्रिकेट सुरू असलेल्या एका सट्टा अड्यावर सोमवारला रात्री पोलीसांनी छापा टाकला. येथून पोलिसांनी सात बुकींना जेरबंद केले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईल आणि सट्याची खायवाडी करणारे साहित्य जप्त केले.
वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखाळा परिसरात शंकर बाबा मंदिराजवळ एका ले आऊट मध्ये टिन शेड उभारलेले आहे. या टिनशेड मध्ये सट्टा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांना गुप्तहेराकडून प्राप्त झाली. पोलीस अधिक्षक पाटील यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर, पोलीस उपनिरिक्षक अमित जाधव, शिवाजी चौकीचे जमादार नितिन काळे, सतिष गुडदे व १२ राखीव पोलीस कर्मचारी यांना १६ एप्रिल रोजी रात्री ९:४५ वाजताचे सुमारास घटनास्थळी रवाना केले.
यावेळी टिनशेडमध्ये सात युवक (बुकी) मोबाईलद्वारे सट्टा घेत असताना आढळून आले. हा सट्टा आयपीएल क्रिकेट मालिकेमध्ये सोमवारला दिल्ली आणि कोलकाता या संघामध्ये सामना होता. या सामन्यावर खायवाडी सुरू असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले.
पोलीसांनी खायवाडी करणारे सनी कमलाकर डोंगरे (रा. जांभरून नावजी), रंजीत लिलाधर काकडे (रा. तांदळी ह.मु. सुदर्शन नगर, वाशिम), गणेश मनोहर वानखडे (रा. सावरगाव जिरे), नरेश मधुकर ठाकरे (रा. लाखाळा, वाशिम), अमोल उध्दवराव भांदुर्गे (रा. काळे फैल, वाशिम), सुधिर अनिल दायमा (रा. साईलिला नगर, वाशिम) व राहुल रमेशचंद्र लाहोटी (रा. चांडक ले आऊट, वाशिम) यांना रात्री अटक केली. त्यांचेकडून रोख ९५४० रूपये, चार मोटरसायकल, आठ मोबाईल, एक लॅपटॉप, एक टी.व्ही व खायवाडीचे साहित्य असा एकुण १ लाख १ हजार ५४३ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्यांचेविरूध्द कलम ४,५, मुंबई जुगार अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मंगळवारला सकाळी सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.