लोकमत न्युज नेटवर्क वाशिम: पावसाळा अद्याप सुरू झाला नसताना गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी येत आहेत. अशात आधीच मजुरांच्या तुटवड्यामुळे अडचणीत असलेल्या शासकीय कापूस खरेदीवर अधिकच परिणाम होण्याची भीती असून, जागेअभावी कपाशीची मोजणीही संथगतीने करावी लागत आहे. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी ही कसरत करावी लागत असल्याचे प्रतवारीकारांकडून सांगण्यात येत आहे.वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर, अनसिंग, कारंजा आणि मानोरा या चार ठिकाणी शासकीय कापूस खरेदी सुरू आहे. त्यात कारंजा आणि मानोरा येथे केंद्रीय कापूस महामंडळाचे (सीसीआय) उपअभिकर्ता म्हणून फेडरेशनच्यावतीने, तर अनसिंग आणि मंगरुळपीर येथे सीसीआयच कापूस खरेदी करीत आहे. खरेदी करण्यात येत असलेल्या ठिकाणीच जिनिंग करून कपाशीच्या गाठी तयार करण्यात येत आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज असते; परंतु २४ मार्चपासून कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जिनिंग, प्रेसिंगमध्ये कार्यरत परराज्यातील कामगार आपापल्या घरी परत गेल्याने कामगारांचा तुटवडा निर्माण झाला; परंतु शासकीय खरेदीत नोंदणी केलेल्या शेतकºयांसह इतर शेतकºयांकडे शिल्लक असलेला कापूस खरेदी करण्याच्या उद्देशाने शासन, प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार उपलब्ध कामगारांच्या आधारेच उपरोक्त चारही ठिकाणी कपाशीची खरेदी सुरू करण्यात आली आहे. रखरखत्या उन्हातही काही दिवस संभाव्य धोका पत्करून ही खरेदी सुरू असताना आता गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडत असल्याने त्यात अधिकच अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारंजा, मानोऱ्यात ७८ हजार क्विंटल खरेदी वाशिम जिल्ह्यात चार ठिकाणी कापूस खरेदी सुरू असून, त्यातील कारंजा येथील शासकीय खरेदी केंद्रावर १ जूनपर्यंत ६० हजारांहून अधिक, तर मानोरा येथील दोन केंद्रांवर मिळून १८ हजार ३०० क्विंटल कपाशीची खरेदी करण्यात आली आहे. अर्थात जिल्ह्यातील शेतकºयांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असून, खासगी बाजारात मिळणाºया अल्पदरामुळे त्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे धाव घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
पावसाचे सावट; शासकीय कापूस खरेदीत अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 4:02 PM