Video : वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात साचले पावसाचे पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 06:00 PM2019-06-22T18:00:40+5:302019-06-22T18:43:51+5:30
वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका गळक्या स्वच्छतागृहामधून वॉर्ड क्रमांक ३० मध्ये चक्क पावसाचे पाणी शिरल्याने उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णांची त्रेधातिरपीट उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात शनिवार, २२ जून रोजी प्रथमच जोरदार पाऊस झाला. यादरम्यान वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका गळक्या स्वच्छतागृहामधून वॉर्ड क्रमांक ३० मध्ये चक्क पावसाचे पाणी शिरल्याने उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णांची त्रेधातिरपीट उडाली. सोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गचाळ कारभार यामुळे पुन्हा एकवेळ चव्हाट्यावर आला.
गोरगरिब कुटूंबातील सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणसाठी उभारण्यात आलेले वाशिममधील २०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय या ना त्या कारणांनी नेहमीच चर्चेत असते. दैनंदिन स्वच्छतेकडे आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णालयामधील सर्वच वॉर्डांमधील स्वच्छतागृह अक्षरश: घाणीने माखली आहेत. जैव वैद्यकीय कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी रुग्णालय परिसरात त्याचे ढिगार साचत आहेत. यातही कळस म्हणजे २२ जून रोजी झालेल्या पावसाचे पाणी गळक्या स्वच्छतागृहामधून चक्क रुग्ण भरती असलेल्या वॉर्ड क्रमांक ३० मध्ये शिरल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची पुरती गैरसोय झाली. या गंभीर प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाप्रती सर्वच स्तरातून रोष व्यक्त होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील ड्रेनेज ब्लॉक झाल्याने २२ जून रोजी वॉर्ड क्रमांक ३० मध्ये पावसाचे पाणी साचले. ड्रेनेजचे काम करण्यासाठी शासनाकडून ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे; मात्र निविदा प्रक्रिया राबवून हे काम पूर्ण करण्यास विलंब लागणार आहे.
- डॉ. बालाजी हरण
अतीरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम