वाशिम: जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसामुळे काढणी पश्चात सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. यात पीकविमाधारक शेतकऱ्यांचा समावेश असून, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानापोटी जिल्हाभरातील ९३२० शेतकऱ्यांनी कृषी विभाग, पीकविमाकंपनीकडे नुकसानभरपाईसाठी २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज केले आहेत. त्यापैकी ४६३८ शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, हे प्रमाण जवळपास ५० टक्के आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला आहे. सोयाबीन काढणी सुरू झाली असतानाच परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. त्यामुळे काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. यात ९३२० शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले. त्यात आॅनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८४३०, तर आॅफलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्यां शेतकऱ्यांची संख्या ८९० आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार आजवर ४६३८ शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
परतीच्या पावसामुळे झालेल्या सोयाबीन पीक नुकसानाबाबत ९ हजारांहून अधिक अर्ज पीकविमा कंपनी आणि कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी सर्वेक्षण करीत आहेत. आजवर ४६३८ शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण त्यांनी केले आहे. -शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम