मालेगाव (वाशिम) - येथील एका स्वस्त धान्य दुकानात ग्राहकाला आधारकार्ड लिंक करण्याचे सांगितल्यावरून गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान दुकानदार व ग्राहकात वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले असून, समाजकंटकांनी दुकान, वाहनांची तोडफोड केली.
मालेगाव येथील एका स्वस्त धान्य दुकानात गुरूवारी एक ग्राहक रेशनच्या धान्यासाठी गेला असता, आधारकार्ड लिंक करण्याचे त्याला सांगण्यात आले. यावरून संबंधित दुकानदार व ग्राहकात वाद झाला. शाब्दीक वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. हाणामारीत संबंधित दुकानदार व त्याचे भाऊ जखमी झाले. समाजकंटाकांनी शहरातील काही दुकानावर तसेच वाहनांवरही दगडफेक केली. दगडफेकीत चार वाहनांचे नुकसान झाले. दोन्ही गटातील सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चार जणांना अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आले. दगडफेक पाहून व्यापाºयांनी बाजारपेठ बंद ठेवली. सध्या तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. याप्रकरणी मालेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.