नंदकिशोर नारे
वाशिम : रेल्वेस्थानक, बसस्थानकासह शहरातील प्रमुख चाैकांमध्ये रिक्षाचालक अस्ताव्यस्त वाहने उभी करून वाहतूक प्रभावित करीत आहेत. तसेच प्रवाशांसाठी कधी राईट तर कधी लेफ्ट वाहने वळवीत असल्याने प्रवाशांना वैताग आला आहे.
वाशिम शहरातील अनेक मुख्य चाैकांमधून ऑटाेचालक प्रवाशांना प्रवास करवीत आहेत. रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तींना ताे हात न दाखविला तरी त्यांच्यासमाेर उभे राहून कुठे जायचे याची विचारणा करून ऑटाेमध्ये बसलेल्या प्रवाशांना वेळेवर न पाेहोचवत असल्याने प्रवाशांना वैताग आला आहे. बसस्थानकाच्या बाजूला तर चक्क ऑटाेची लाईन लागलेली दिसून येते. काही नियमानुसार लाईनने प्रवासी भरतात तर काही चक्क मध्येच शिरून प्रवाशांची पळवापळवी करताना दिसून येतात. ही बाब काही ऑटाेचालकांच्या निदर्शनास आल्यास अनेकदा वाद झाल्याच्या घटना ही घडल्या आहेत. या सर्व प्रकाराला प्रवासी मात्र त्रस्त झाले आहेत.
...............
या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी
बसस्थानक -
बसस्थानकातून प्रवाशी प्रवास करून बाहेर आल्याबराेबर कुठे जायचे यासाठी ऑटाेचालक घाेळका घालतात. स्थळ सांगितल्यानंतर मात्र अव्वाच्या सव्वा भाडे सांगून वेठीस धरतात.
सिव्हिल हाॅस्पिटल -
खेड्यापाड्यातून येणाऱ्या रुग्णांना व नातेवाइकांना सिव्हिल हाॅस्पिटलला जाणे येण्याकरिता येथे माेठ्या प्रमाणात आॅटाे दिसून येतात. काेणतेही भाडे स्थिर नाही.
रेल्वेस्थानक -
रेल्वे येण्या व जाण्याच्या वेळेवर रेल्वेस्थानकावर ऑटाेंचा जणू पाेळा भरलेला दिसून येताे. प्रवासी आल्याबराेबर आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न करतात.
निर्धारित भाडे नसल्याने फसवणूक
वाशिम शहरातील ऑटाेचालकांचे काेणतेच भाडे फिक्स करण्यात आलेले नाही. ते ठरवतील ते भाडे प्रवाशांना द्यावे लागते. त्यात रात्रीची व पहाटेची वेळ असल्यास तर भाडे अव्वाच्या सव्वा माेजावे लागतात. वाशिम शहरातून कुठेही जायचे असल्यास फिक्स भाडे नाही. त्यामुळे फसवणूक हाेतेय.
- शिवा पाटील, वाशिम
बसस्थानक ते रेल्वेस्थानक, रेल्वेस्थानक ते बसस्थानक हा प्रवास करायचा असल्यास भाडे निर्धारित आहे. तेही रेल्वेच्या वेळेवर इतर वेळी मात्र वेगळे भाडे. यामुळे प्रवाशांची, शेतकऱ्यांची पंचाईत हाेते. प्रशासनाने शहरामध्ये सिटी बसेस सुरु करणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑटाेचालकांचा हा त्रास थांबेल.
- संताेष लाेखंडे, वाशिम
मनमानी भाडे
बसस्थानकावरून रेल्वेस्थानकावर ये जा करिता भाडे रेल्वेगाड्यांच्या वेळेवर व्यवस्थित आकारण्यात येते.
रेल्वेच्या वेळा वगळता रेल्वेस्थानक परिसरात जायचे असल्यास अव्वाच्या सव्वा भाडे प्रवाशांकडून घेण्यात येते.
अकाेला रस्त्यावरील वसाहतींमध्ये जायचे असल्यास ऑटाेचालकांकडून ५० रुपये घेतले जातात. तिकडून प्रवासी मिळत नसल्याचे कारण केल्या जाते.
शहरात अस्ताव्यस्त वाहतुकीस सुरळीत ठेवण्याचे काम व्यवस्थितपणे शहर वाहतूक शाखा पार पाडत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटाेचालकांना दंड करण्यात येताे. आतापर्यंत शेकडाे ऑटाेचालकांवर दंड झालेला आहे. ते आकारण्यात येत असलेले भाडे त्यांचा प्रश्न आहे, परंतु प्रवाशांची लूट केली जात असेल व तक्रार केली असेल तर याची खबरदारी घेतली जाईल.
- नागेश माेहाेड, शहर वाहतूक शाखा