रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचा राजीनामा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 07:32 PM2017-11-09T19:32:27+5:302017-11-09T19:40:39+5:30
रिसोड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन रामकिसन पाचरणे यांनी बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन रामकिसन पाचरणे यांनी बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला. यापुर्वी २५ आॅक्टोंबर रोजी उपसभापती विठ्ठलराव आरु यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिला होता. आता सभापती गजानन पाचरणे यांनी राजीनामा दिल्याने बाजार समितीचे सभापती व उपसभापती हीे दोन्ही पदे रिक्त होणार असुन नव्याने सभापती व उपसभापती पदावर कोण विराजमान होणार याकडे तालुक्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
सन २०१५ साली रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी आमदार विजयराव जाधव, बाबाराव पाटील खडसे, विष्णुपंत भुतेकर, वामनराव देशमुख यांच्या नेतृत्वात महाआघाडी करुन बाजार समितीची निवडणुक लढविल्या गेली. या निवडणुकीत महाआघाडीचे बाजार समितीवर एकतर्फी वर्चस्व निर्माण झाले. अठरा संचालकापैकी सतरा संचालक महाआघाडीचे निवडुन आले तर विरोधी पॅनलमधून एकमेव संचालक डॉ. चंद्रशेखर देशमुख निवडून आले आहेत. निवडणुक प्रक्रियेदरम्यान महाआघाडीत जागा वाटप व निवडणुक निकालाअंती झालेल्या तडजोडीनुसार सभापती व उपसभापती पदावर कोणत्या उमेदवाराने किती कार्यकाळ त्या पदावर विराजमान राहायचे हे महाआघाडीच्या नेत्यांनी ठरविले होते. त्यानुसार सभापती पाचरणे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला आहे.
आमचे नेते अनंतराव देशमुख व तालुक्यातील जनतेच्या आशिवार्दाने सन २००२ पासून सभापती, संचालक पदावर आजपर्यंत मला बाजार समितीमध्ये शेतकºयांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आमच्या नेत्यांनी पार्टीतील नवीन कार्यकर्त्यांना सभापतीची संधी देण्याचे कबूल केल्याने राजीनाम्या संदर्भात नेत्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले आहे. नेत्यांना दिलेला शब्द पाळावाच लागतो. यापुढे संचालक म्हणून शेतकºयांच्या हितासाठी काम करत राहणार.
- गजानन पाचरणे, सभापती कृ.उ.बा.स, रिसोड
रिसोड बाजार समितीच्या सभापतीचा राजीनामा बुधवारी प्राप्त झाला आहे. तो मंजूर करुन येत्या १५ दिवसात नविन सभापती -उपसभापतीची निवड करुन कार्यकारीणी स्थापन करण्यासाठी अध्याशी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक रिसोड यांची नियुक्ती करण्यात येईल. या संदर्भातील आदेश लगेच जारी करणार आहे.
- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम