रस्ता कामामुळे २०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणास ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 03:02 PM2019-11-24T15:02:24+5:302019-11-24T15:02:35+5:30
अतिरिक्त १५ ते २० किलोमिटरचा फेरा मारावा लागत असल्याने ही बाब त्रासदायक ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार : शेलूबाजारवरून चिखलीमार्गे वाशिमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम सद्या सुरू आहे. त्यासाठी या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली. यामुळे मात्र सोयता, भोयता, दुधखेडा, पिंप्री अवगण, पिंप्री खु. आदी गावांमधून शेलूबाजार येथे दैनंदिन आॅटोने शिक्षणासाठी येणाºया सुमारे २०० विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे. त्यांच्या शिक्षणास यामुळे ‘ब्रेक’ लागल्याने गावकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
शेलूबाजार-वाशिम या रस्त्याच्या सुरूवातीच्या ९ किलोमीटर अंतरात ‘सेंसर पेव्हर’ लावून डांबरीकरण करण्याचे काम केले जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली.
१५ ते २० किलोमिटरचा फेरा ठरतोय त्रासदायक
सोयता, भोयता, दुधखेडा, पिंप्री या गावांमधील नागरिक तथा शालेय विद्यार्थ्यांना शेलूबाजार येथे ये-जा करण्यासाठी बोºहाळा-एरंडा-किन्हीराजा हा रस्ता खुला आहे; मात्र त्यासाठी अतिरिक्त १५ ते २० किलोमिटरचा फेरा मारावा लागत असल्याने ही बाब त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी नमूद गावांमधील विद्यार्थ्यांसह कुणीच शेलूबाजार येथे आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.