.................
वाशिम, मानोराची स्थिती समाधानकारक
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आता बहुतांशी निवळत चालल्याचे दिसून येत आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील वाशिम व मानोरा या दोन तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
...................
पावसाची हजेरी, पिकांना संजीवनी
अनसिंग : परिसरातील काही गावांमध्ये शुक्रवारी दुपारी व सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यामुळे पाण्याअभावी संकटात सापडलेल्या पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
..................
कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शिबिर
मंगरूळपीर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करता येणे सोयीचे व्हावे, यासाठी काही गावांमध्ये शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्यास शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
.....................
स्मशानभूमी, शेड उभारण्याची मागणी
वाशिम : तालुक्यातील दगडउमरा परिसरातील अनेक गावांमध्ये अद्याप अंत्यसंस्कार करण्यासाठी सुसज्ज स्मशानभूमी किंवा शेड उभारण्यात आलेले नाही. यामुळे विशेषत: पाऊस आल्यास अंत्यसंस्कारांत अडचणी निर्माण होत आहेत.
....................
मुलींना रोप वितरणाचा कार्यक्रम
वाशिम : कन्या वनसमृद्धी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. याअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाने लहान मुलींना रोप वितरणाचा कार्यक्रम हाती घेतला असून त्यास प्रतिसाद मिळत आहे.
.......................
वन्यप्राण्यांचा हैदोस, शेतकरी वैतागले
वाशिम : जिल्ह्यातील कोठारी (ता. मंगरूळपीर) परिसरात नीलगाय, रानडुक्कर, हरीण या वन्यप्राण्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. कोवळ्या पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान केले जात असून वनविभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
..............
खोळंबलेल्या पेरण्यांना जोरात सुरुवात
मेडशी : गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी पाऊस झाला. यामुळे खोळंबलेल्या खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला जोरात सुरुवात करण्यात आली आहे. ज्यांनी यापूर्वी पेरणी केली, त्यांची पिके बहरल्याचे दिसत आहे.
.....................
सत्संगाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संत निरंकारी मिशनच्या वतीने सत्संगाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेतला आहे. त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सेवादल संचालक दत्ता बंडेवार यांनी केले आहे.
.....................
ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत कमी झाली आहे. यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
......................
कोठारी गावतलावात जमला पाणीसाठा
कोठारी : यंदाच्या उन्हाळ्यात कोठारी गावाला लागून असलेला गावतलाव पूर्णत: कोरडा झाला होता. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने त्यात पाणीसाठा झाला असून सध्या जवळपास ५० टक्के पाणीसाठा असल्याची माहिती आहे.
...............
ग्राम समितीकडून लसीबाबत जनजागृती
वाशिम : ग्रामीण भागात स्थापन करण्यात आलेल्या ग्रामसमितीकडून लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. याअंतर्गत तोंडगाव परिसरात शुक्रवारी ग्राम समिती सदस्यांनी गावात फिरून नागरिकांचे उद्बोधन केले.