राज्यातील गोरगरीब आणि गरजू मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, हे लक्षात घेऊन रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. मानोरा तालुक्यामध्ये कमी प्रमाणात रोजगार हमीची कामे झालेली आहेत. जॉबकार्ड धारकांना रोजगार हमीची कामे मिळण्यासाठी तालुका प्रशासनाकडे कामाची मागणी केल्यास अशा जॉब कार्डधारकांना काम उपलब्ध करून द्यावे लागते असा नियम आहे; परंतु कामाची मागणी केल्यास रोजगार हमीचे काम मिळते याबाबत मजुरांना माहिती नसल्याचा फटका तालुक्यातील असंख्य गरजू नागरिकांना बसत आहे. या संदर्भात जनजागृतीही होणे गरजेचे आहे. सामाजिक वनीकरण विभागाची वृक्षलागवड असो अथवा पांदण रस्त्याची निर्मिती; छोटे शेततलावसुद्धा रोजगार हमीच्या माध्यमातून मजुरांद्वारे करवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा रोजगार हमीचा मूळ उद्देश आहे. जनजागृती नसल्याने मजुरांना रोजगारापासून दूर राहावे लागत आहे.
‘रोहयो’ची कामे ठप्प; मजुरांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:43 AM