तळप बु.(जि. वाशिम),दि. २५- ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनेक शिक्षक मुख्यालयी न राहता ३0 ते ४0 किलोमीटर अंतरावरून अप-डाउन करतात. त्यामुळे त्यांना शाळेला पोहोचायला नेहमीच विलंब होतो. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शिक्षकांवर कारवाई करण्यास मात्र शिक्षण विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. अशाच कारणांमुळे शनिवार, २४ सप्टेंबर रोजी तळप बु. येथील जिल्हा परिषद शाळा ७.४५ वाजता उघडण्यात आली. मानोरा तालुक्यातील तळप बु. परिसरातील तळप बु.सह कार्ली, यशवंतनगर, बोरव्हा व सेवादासनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक मुख्यालयी न राहता ३0 ते ४0 किलोमीटर अंतरावरून रोज अप-डाउन करतात. त्यामुळे त्यांना शाळेला पोहोचायला नेहमीच विलंब होतो. सकाळची शाळा असो की दुपारची, शिक्षकांना पोहोचायला विलंब होतो. तसेच शाळाही लवकर सोडल्या जाते. शनिवारी सकाळी ७ ते ११ व इतर दिवशी १0.२0 ते ५ अशी शाळेची वेळ आहे. परंतु शनिवारला शाळा ७.४५ ते ८ वाजता उघडण्यात येत असल्याचे दिसून येते. तळप बु. येथे १ ते ७ पर्यंत वर्ग असून, शनिवारी सदरहून शाळा ७.४५ वाजता उघडली. मुख्याध्यापकाच्या गलथान कारभारामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षण विभागाला ही बाब माहीत असताना त्याकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष केले जात आहे. वरिष्ठांनी याबाबत लक्ष घालण्याची मागणी पालकवर्गाकडून होत आहे.
ग्रामीण भागातील शिक्षणाचा खेळखंडोबा!
By admin | Published: September 26, 2016 2:32 AM