वाशिम : गतवर्षी कोरोना काळात बंद झालेली पॅसेंजर रेल्वे अद्यापही सुरू झालेली नाही. अकोला येथून वाशिममध्ये सकाळी ११ वाजता पोहोचणारी इंटरसिटी रेल्वे सुरू आहे; मात्र सायंकाळी ५.३०नंतर परतण्याकरिता रेल्वे नाही. दुसरीकडे एस. टी.च्या वेळा अनिश्चित असल्याने दैनंदिन ये-जा करणाऱ्या प्रशासकीय कार्यालयांमधील ‘बाबूं’ची मोठी पंचाईत झाली आहे.
प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, कृषी विभाग, तहसील कार्यालय, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा विभागातील अनेक कर्मचारी अकोला येथून दैनंदिन ‘अपडाऊन’ करतात. अकोला येथून दररोज सकाळी ९.३० वाजता काचीगुडा-नरखेड ‘इंटरसिटी एक्सप्रेस’ सोडण्यात येते. ही रेल्वे वाशिम येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचते. या रेल्वेने प्रवास करून अनेक कर्मचारी ११.३०च्या सुमारास कर्तव्यावर हजर होतात; मात्र सायंकाळी वाशिममार्गे अकोला जाणाऱ्या ‘इंटरसिटी’ची वेळ दुपारी ४.३०ची आहे आणि त्यानंतर कुठलीही रेल्वे नाही. या रेल्वेच्या वेळेपर्यंत मात्र कार्यालयातून सुट्टी होत नसल्याने अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
.................
बॉक्स :
डिझेलसाठी ‘कॉन्ट्रिब्युशन’
पॅसेंजर रेल्वे अद्याप बंद आहे आणि एस. टी.च्या वेळा अनिश्चित असल्याने ‘अपडाऊन’ करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी चारचाकी वाहनाने प्रवासाचा पर्याय निवडला आहे. यासाठी ठराविक ४ ते ५ कर्मचारी ‘कॉन्ट्रिब्युशन’ काढून डिझेलचा खर्च करत आहेत.
..................
काही कर्मचाऱ्यांची कर्तव्याला वेळेआधीच ‘दांडी’
प्रशासकीय कामकाजाची वेळ साधारणत: सकाळी १०.३० ते ५.३०ची आहे; मात्र वाशिमवरून अकोला येथे जाणाऱ्या ‘इंटरसिटी एक्सप्रेस’ची वेळ दुपारी ४.३०ची असल्याने ‘अपडाऊन’ करणारे काही कर्मचारी १ तास आधीच कर्तव्याला दांडी मारून रेल्वे स्थानकावर पोहोचत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज खोळंबत असून, सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे.