‘समृद्धी’च्या भुसंपादनाला ८० टक्क्यांवर लागला ‘ब्रेक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:59 PM2018-04-17T14:59:43+5:302018-04-17T14:59:43+5:30
वाशिम : एकत्रीकरणाचे वाद, वहिवाटीचे मुद्दे, न्यायालयीन प्रकरणे, भूदान यासह इतर स्वरूपातील वादात अडकून असलेल्या जमिनींच्या संपादनाचा मार्ग प्रशस्त होणे अशक्य झाल्याने समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस ८० टक्क्यांवर ‘ब्रेक’ लागला आहे.
वाशिम : एकत्रीकरणाचे वाद, वहिवाटीचे मुद्दे, न्यायालयीन प्रकरणे, भूदान यासह इतर स्वरूपातील वादात अडकून असलेल्या जमिनींच्या संपादनाचा मार्ग प्रशस्त होणे अशक्य झाल्याने समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस ८० टक्क्यांवर ‘ब्रेक’ लागला आहे. यामुळे हे गहण प्रश्न कधी सुटतील आणि महामार्गाचे प्रत्यक्ष काम केव्हा सुरू होईल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांमधून ९७ किलोमिटरचे अंतर कापत पुढे जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी ९०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनींचे संपादन केले जात आहे. सुरूवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांकडून झालेल्या प्रखर विरोधामुळे रखडलेल्या भूसंपादन प्रक्रियेस सरळ खरेदी पद्धतीचा अवलंब केल्यानंतर मध्यंतरी चांगला वेग प्राप्त झाला होता. त्यामुळेच एप्रिलच्या सुरूवातीला जिल्ह्यात ८० टक्के जमिनींचे संपादन यशस्वी झाले. सद्या मात्र ही प्रक्रिया पूर्णत: ठप्प पडली असून जोपर्यंत जमिनींवरील वाद निकाली निघत नाहीत, तोपर्यंत भूसंपादन अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे समृद्धी महामार्गाचे काम नेमके कधी सुरू होणार, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.