स्वामी विवेकानंद विद्यालयात दशरात्रौत्सवाच्या सुरुवातीला ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्सव समितीच्या अध्यक्ष शीला कांबे होत्या. उपाध्यक्ष रामचंद्र काळबांडे यांनी उद्घाटन केले; तर प्रमुख व्याख्याते म्हणून शंकर भारती, प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य बाळासाहेब गोटे, संचालक नारायण काळबांडे, रमेश काळबांडे, पर्यवेक्षक मोहन इंगळे, प्रकाश अवचार, सदाशिव गलांडे, वैजनाथ हजारे, अनिल काळबांडे, प्रवीण काळबांडे, दत्तराव खासबागे आदींची उपस्थिती लाभली.
जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शंकर भारती म्हणाले, सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या योगदानामुळेच शिक्षणाचे मार्ग मोकळे झाले. फुले दाम्पत्यांनी शिक्षणाचे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवल्याने स्त्रिया राष्ट्रपती, केंद्रीय अर्थमंत्री, शिक्षण मंत्री अशा मानाच्या पदांपर्यंत मजल मारू शकल्या, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वरी जाधव हिने केले. प्रतीक्षा मुळे हिने आभार मानले.
..............................
बॉक्स :
शिक्षकच झाले वक्ते; तर विद्यार्थी प्रेक्षक
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे यंदा प्रथमच सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाचा कार्यक्रम शाळा स्तरावर छोटेखानी स्वरूपात साजरा केला जात आहे. बाहेरचा एकही वक्ता बोलाविण्यात आलेला नाही. शाळेत दैनंदिन उपस्थिती दर्शविणारे २५० विद्यार्थी प्रेक्षक; तर शिक्षकांमधूनच एखादा वक्ता निवडला जात आहे. कार्यक्रमादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यासोबतच प्रत्येकाने मास्कचा वापर करण्याचे बंधन पाळले जात असल्याचे दिसून येत आहे.