सुजलाम, सुफलाममधील शेततळ्यांची योजना बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 04:47 PM2019-06-23T16:47:51+5:302019-06-23T16:47:59+5:30

प्रस्तावित ६४ शेततळे आणि दोन वनतळ्यांपैकी केवळ १ शेततळे पूर्ण झाले, तर ८ शेततळे अर्धवट सोडण्यात आले असून, तब्बल ५७ शेततळ्यांच्या कामाला सुरुवातच करण्यात आली नाही.

 The scheme of farm lake not fulfill in washim | सुजलाम, सुफलाममधील शेततळ्यांची योजना बारगळली

सुजलाम, सुफलाममधील शेततळ्यांची योजना बारगळली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वशिम: राज्यातील दुष्काळ स्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) समन्वयातून सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात प्रस्तावित ६४ शेततळे आणि दोन वनतळ्यांपैकी केवळ १ शेततळे पूर्ण झाले, तर ८ शेततळे अर्धवट सोडण्यात आले असून, तब्बल ५७ शेततळ्यांच्या कामाला सुरुवातच करण्यात आली नाही.
पावसाची अनियमितता आणि वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने बीजेएसच्या समन्वयातून सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्याचा निर्णय गतवर्षी घेतला होता. या अभियानांतर्गत नाला खोलीकरण, नाला सरळीकरण, नदी खोलीकरण, गाळ उपसा, सीसीटी, डीप सीसीटीसह शेततळ्यांचे खोदकाम ही जलसंधारणाची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यात वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यात मिळून ६६ शेततळ्यांचे खोदकाम करण्यात येत होते. कृषी विभाग, वनविभागासह महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली ही कामे केली जाणार होती. यासाठी बीजेएसने जेसीबी आणि पोकलन मशीनही उपलब्ध करून दिल्या होत्या. तथापि, यातील केवळ ८ कामांना सुरुवात झाली आणि त्यातील तीन शेततळ्यांचे काम पूर्ण झाले, तर ६ शेततळ्यांचे काम अर्धवट स्थितीत सोडण्यात आले. उर्वरित ५७ शेततळ्यांच्या कामांना सुरुवातही करण्यात आली नाही. प्रत्यक्षात सुजलाम, सुफलाम अंतर्गत शेततळ्यांची कामे करताना शासनाच्या निर्धारित इंधन खर्चाच्या दरात पूर्ण होणे शक्य नसल्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्यानंतरच दिसून आले. त्यामुळे आता उर्वरित शेततळे पूर्ण होण्याचीही शक्यता राहिली नाही.
कारंजा, वाशिममधील कामेच पूर्ण
सुजलाम, सुफला अभियानांतर्गत मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक २४, कारंजा तालुक्यात २३, मानोरा तालुक्यात १४, मालेगाव तालुक्यात २ तर रिसोड तालुक्यात एका शेततळ्याचे खोदकाम प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी वाशिम तालुक्यातील चिखली येथील मिळून प्रत्येकी शंभर चौरस मीटर शेततळ्याचे काम पूर्णत्वास गेले, तर कारंजा तालुक्यातील धामणी आणि महागाव, मानोरा तालुक्यातील इंझोरी, सोमनाथनगर, मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुठा आणि चांभई येथील शेततळे, तसेच मालेगाव तालुक्यातील सुकांडा आणि चिवरा येथील वनतळ्यांचे काम अर्धवट स्थितीतच सोडण्यात आले असून, इतर ५७ शेततळ्यांच्या कामांना प्रशासनाकडून सुरुवातच करण्यात आली नाही. आता पावसाळा सुरू झाल्याने अर्धवट राहिलेली कामेही पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title:  The scheme of farm lake not fulfill in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.