शाळेचे वर्ग बंद; शैक्षणिक शुल्क सुरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 05:19 PM2020-10-27T17:19:09+5:302020-10-27T17:19:19+5:30
Washim News, Education Sector शुल्क आकारू नये अशी मागणी पालकांमधून होत आहे.
वाशिम : कोरोनामुळे अद्याप शाळेचे वर्ग सुरू झाले नाहीत; दुसरीकडे मात्र शैक्षणिक शुल्कामध्ये संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय आदीचा समावेश केला जात असल्याने पालकांना भुर्दंड बसत आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, असा सूर पालकांमधून उमटत आहे.
देशात साधारणत: मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळेचे वर्ग अद्याप विद्यार्थ्यांसाठी खुले झाले नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळांनी आॅनलाईन पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू केलेली आहे. शाळेचे वर्ग बंद असल्याने साहजिकच संगणक व विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालयदेखील बंदच आहे. त्यामुळे यावर्षी शैक्षणिक शुल्कामधून संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय या बाबींना वगळण्यात यावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे. परंतू, पालकांची मागणी धुडकावून लावत बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही सर्व शैक्षणिक शुल्क भरावे, असे संदेश पालकांच्या मोबाईलवर पाठविण्याचा सपाटा लावला आहे. शैक्षणिक शुल्काचा भरणा न केल्यास आॅनलाईन पद्धतीने होणाºया प्रथम सत्र परीक्षेला बसण्यास विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात येणार नाही, असाही इशारा काही शाळांनी दिल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आॅनलाईन पद्धतीच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंदर्भात शैक्षणिक शुल्काची आकारणी करावी, संगणक, प्रयोगशाळा व ग्रंथालयाचे शुल्क आकारू नये अशी मागणी पालकांमधून होत आहे.
यावर्षी वर्ग बंद असल्याने संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय बंदच आहेत. त्यामुळे या तीन बाबींची शुल्क आकारणी करू नये. याचा भुर्दंड पालकांना बसणार नाही.
विशाल देबाजे
पालक, वाशिम
संगणक, ग्रंथालय बंद असल्याने त्या शुल्काचा समावेश एकूण शुल्कामध्ये करण्यात येऊ नये, अशा सूचना शाळांना दिल्या जातील.
अंबादास मानकर,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम